आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा थलायवा महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. गेल्या 16 पर्वापासूनचा पदभार ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर टाकला गेला आहे. या पार्श्वभूमीवर विराट कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. पण सामन्याच्या काही तासांआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व आयपीएलच्या सुरुवातीपासूनच महेंद्रसिंह धोनीच्या हाती होतं. पण आता नेतृत्वाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्या हाती सोपवली गेली आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात महेंद्रसिंह धोनी विकेटकीपर फलंदाज म्हणून दिसणार आहे. त्याचं वय आणि फॉर्म पाहता त्याचा वापर इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनही केला जाऊ शकतो.
एकंदरीत काहीही असलं तर धोनीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. एका अर्थाने महेंद्रसिंह धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असणार यात दुमत नाही. पुढच्या मेगा लिलावात महेंद्रसिंह धोनी खेळाडू म्हणून नसेल यावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झालं आहे, असं जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान महेंद्रसिंह धोनी कॅप्टन्सी करणार नसल्याचं कळताच विराट कोहलीची जुनी प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
“पिवळ्या जर्सीतील दिग्गज कर्णधारपदाचा कार्यकाळ… पण हा अध्याय चाहते कधीही विसरणार नाही. धोनीबाबत कायमच आदर आहे.”, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने 24 मार्च 2022 रोजी दिली होती. आता हे जुनं ट्वीट व्हायरल होत आहे. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनी-विराट कोहली आणि रोहित शर्मा कर्णधारपद भूषवणार नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चाहत्यांनी हे पर्व दिग्गज खेळाडूंचं शेवटचं पर्व असल्याचं म्हंटलं आहे. एका चाहत्याने सुपरस्टारच्या सुवर्णयुगाचा शेवट असं लिहिलं आहे.ऋतुराज गायकवाड याने एशियन गेम्समध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे.
तसेच भारताला पहिलंवहिलं सूवर्णपदक मिळवून दिलं आहे. त्यामुळे भविष्यातील कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडकडे पाहिलं जात आहे. ऋतुराज गायकवाड आतापर्यंत 52 आयपीएल सामने खेळला आहे. यात त्याने 1797 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 14 अर्धशकांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 22 सप्टेंबर 2020 रोजी पदार्पण केलं होतं.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनेर, एन सिमरंत, एन. सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली. जखमी/माघार घेतलेले खेळाडू: डेव्हॉन कॉनवे, मथीशा पाथिराना.