बीडमधील चिंचोली माळी इथं एका सातवीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सातवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलाने जनावरांच्या गोठ्यात गळफास घेत जीवन संपवलं.दिपक सचिन अकलूजकर असं विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याच्या आत्मत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिपकचे वडील सचिन अकलूजकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आईने दुसरं लग्न केलं. आईच्या दुसऱ्या लग्नानंतर दिपक घरी एकटाच होता. त्याला आत्याने चिंचोलीमाळी इथं आणलं. तसंच शाळेतही घातलं होतं. आत्याच त्याचा सांभाळ करत होती.
दिपकने आत्याच्या घराशेजारीच असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यानं आत्महत्या केल्याची माहिती उघडकीस आली. दीपकचा मृतदेह गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. एकटा पडलेल्या दीपकच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.