Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीअजित पवार गट 7 जागांसाठी आग्रही, महायुतीच्या जागावाटपाचा सस्पेन्स कधी संपणार?

अजित पवार गट 7 जागांसाठी आग्रही, महायुतीच्या जागावाटपाचा सस्पेन्स कधी संपणार?

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटता सुटताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे नवी दिल्लीत काल महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत तिढा सुटेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण तिढा काही सुटला नाही.

भाजपने महाराष्ट्रात 20 उमेदवारांची घोषणा केली आहे. आता महायुतीचा तिढा सुटला की, भाजपकडून आणखी उमेदवारांची घोषणी केली जाणार आहे. पण तत्पूर्वी महायुतीचा तिढा सुटणं महत्त्वाचं आहे. महायुतीचा तिढा सुटावा यासाठी शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठका पार पडत आहेत. पण तिढा सुटत नाहीय. त्यामागील कारण म्हणजे तीनही पक्ष काही जागांवर आपला दावा सोडायला तयार नाहीत. अजित पवार यांच्या गटाला 7 जागांवर लढायचं आहे. त्यासाठी अजित पवार गट प्रचंड आग्रही देखील असल्याची माहिती समोर येत आहे.राष्ट्रवादीचा अजित पवार गट 7 जागांसाठी आग्रही आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बारामती, शिरुर आणि रायगडच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहेच.

पण अजित पवार गटाला सातारा, धाराशिव, परभरणी आणि गडचिरोलीचीदेखील जागा हवी आहे. राष्ट्रवादी 6 जागांवर लढणार असल्याची बातमी आज सकाळी समोर आली होती. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 7 जागांवर दावा केला आहे. अजित पवार यांनी दिल्लीतील अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत 7 जागांची मागणी केली आहे. त्यांनी अमित शाह यांच्यासमोर आग्रही भूमिका मांडली होती. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

 

प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?

“आम्ही लोकसभेच्या ७ जागांवर आडून आहोत. आम्ही ७ जागांच्या खाली निवडणूक लढणार नाही. सातारा लोकसभा मतदारसंघ हा आमचा आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत आणि तो दावा आम्ही सोडला नाही. बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, परभणी आणि गडचिरोली या मतदारसंघावर आमचा दावा आहे”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.सातारच्या जागेवर तिढा का?

सातारा जागेचा तिढा निर्माण होण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. भाजप नेते उदयनराजे भोसले हे साताराच्या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. पण त्यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची आहे. त्यासाठी ते सलग तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. ते दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते. त्यांची काल अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटालाही साताराची जागा हवी आहे.

 

शिरुरमध्ये घडेल तसं साताऱ्यात घडणार?

सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा आम्हीच लढवणार आहोत. उदयनराजे यांनी हवं तर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे आता काय-काय हालचाली घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिरुरमध्ये शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदयनराजे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर की भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतात? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

 

महायुतीचा आज तिढा सुटणार का?

महायुतीच्या कालच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर आज मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. महायुतीच्या नेत्यांची मुंबईत आज पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ही बैठक जागावाटपासाठी अंतिम असल्याचं मानलं जात आहे. या बैठकीत दोन-तीन जागांच्या आदलाबदलीवर चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारनंतर बैठक होण्याची शक्यता आहे. बैठक लवकर झाली तर आजच पत्रकार परिषद घेऊन युतीचा फॉर्म्युला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. बैठकीला उशीर झाला तर घोषणा उद्या जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -