Saturday, January 24, 2026
Homeक्रीडापंजाबच्या पराभवासाठी शिखर धवनने स्वत:लाच धरलं दोषी, सांगितलं काय चुकलं ते

पंजाबच्या पराभवासाठी शिखर धवनने स्वत:लाच धरलं दोषी, सांगितलं काय चुकलं ते

आयपीएल 2024 स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. पंजाबने 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पंजाबने 6 गडी गमवून आणि 4 चेंडू राखून पूर्ण केलं. या सामन्यातील पराभवानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनने मन मोकळं केलं आहे. तसेच पराभवासाठी स्वत:लाच जबाबदार धरलं आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेतील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बंगळुरुने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खऱ्या अर्थाने हा निर्णय शिखर धवनच्या मनाविरुद्ध झाला होता. त्यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. पंजाबची सुरुवात धीमी राहिली. असं असलं तरी 20 षटकात 6 गडी गमवून 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना बंगळुरुला काही सोपं गेलं नाही.

एक क्षण असा वाटत होतं की हा सामना पंजाबच्या पारड्यात झुकतो की काय? पण दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी 20 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी करत विजयश्री खेचून आणला. दिनेश कार्तिकने 10 चेंडूत 28 आणि महिपाल लोमरोरने 8 चेंडूत 17 धावा केल्या. पंजाबचा निसटता पराभव झाल्यानंतर शिखर धवनने आपल्या मनातलं बोलून दाखवलं आहे.

शिखर धवन म्हणाला की, “हा एक चांगला खेळ होता. आम्ही गेममध्ये परतलो आणि पुन्हा हरलो. आम्ही 10-15 धावा कमी केल्या, पहिल्या सहा षटकांमध्ये मी थोडा संथ खेळलो, त्यााच फटका बसला. त्या 10-15 धावा आणि सोडलेला झेल आम्हाला महागात पडला. झेल सोडल्यानंतर विराटने 77 धावा केल्या. आम्ही क्लास प्लेअरचा एक झेल सोडल्याने त्याची किंमत मोजावी लागली. तो झेल आम्ही घेतला असता तर दुसऱ्या चेंडूपासून वेग आला असता. पण आम्ही तिथे गती गमावली आणि मग आम्ही त्याची किंमत मोजली.”

“मी माझ्या धावांवर खूश आहे पण मला वाटते की पहिल्या सहा षटकांमध्ये मी जरा जास्त वेगवान खेळ करू शकलो असतो, हीच गोष्ट मला जाणवत आहे. दुसरीकडे, आम्ही विकेटही गमावल्या, आम्ही सलग दोन विकेट गमावल्या आणि त्यामुळे आमच्यावर दबाव निर्माण झाला.”, असंही कर्णधार शिखर धवन याने पुढे सांगितलं.

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांना अद्याप जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. त्यामुळे दोन्ही संघांची यावेळी जेतेपदासाठी धडपड असणार आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मिळालेल्या पराभवानंतर पंजाबची थेट तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ 2 गुणांसह सहाव्या स्थानावर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -