सलग दुसऱ्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेच वातावरण आहे. SRH कडून पराभव झाल्यानंतर मुंबईच्या डगआऊटमध्ये गंभीर वातावरण होतं. सोशल मीडियावर त्या संबंधीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोर जाव लागलं. सनरायजर्स हैदराबादने पहिली फलंदाजी करताना 3 बाद 277 ही विशाल धावसंख्या उभारली. हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा मुंबई इंडियन्सने चांगला प्रयत्न केला. पण 31 धावांनी त्यांचा पराभव झाला. मुंबई इंडियन्सने 5 बाद 246 धावसंख्येपर्यंत मजल मारली. सलग दुसऱ्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेच वातावरण आहे. SRH कडून पराभव झाल्यानंतर मुंबईच्या डगआऊटमध्ये गंभीर वातावरण होतं. सोशल मीडियावर त्या संबंधीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. माजी कर्णधार रोहित शर्मा, विद्यमान कर्णधार हार्दिक पांड्या आणि संघ मालक आकाश अंबानी यांच्यामध्ये कुठल्यातरी विषयावरुन गंभीर चर्चा सुरु होती.
टॉस जिंकून हैदराबाने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 277 ही विशाल धावसंख्या उभारली. ट्रेविस हेडने (62) हैदराबादला दमदार सुरुवात करुन दिली. अभिषेक शर्मा (63), एडन मार्करम (42) आणि हेनरीच क्लासेन (80) यांच्या तुफानी बॅटिंगच्या जोरावर हैदराबादने मजबूत धावसंख्या उभारली.
मुंबईने हार मानली नाही, पण….
विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने सुद्धा चांगली लढत दिली. सलामीवीर रोहित शर्मा (26), इशान किशन (34) यांनी चांगली सुरुवात दिली. तिलक वर्मा (64), टिम डेविड (42) आणि नमन धीर (30) यांनी फटकेबाजी करुन मुंबईच्या अपेक्षा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. हार मानली नाही. पण 20 व्या षटकाच्या अखेरीस मुंबईची धावसंख्या 5 बाद 246 होती.
अजून बरेच सामने बाकी
सलग दोन पराभवांमुळे मुंबईच्या गोटात गंभीर चर्चा सुरु झाली आहे. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि आकाश अंबानी मॅच संपल्यानंतर परस्परांशी गंभीर चर्चा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तिघांमध्ये काय चर्चा झाली? ते समजू शकलेलं नाही. पण तातडीने गाडी रुळावर आणण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न आहे. अजून बरेच सामने बाकी आहेत. चूका सुधारुन भरारी घेण्याची मुंबई इंडियन्सकडे अजूनही संधी आहे.