“उद्धव ठाकरे यांच्याकडून मला निमंत्रण आलं म्हणून मी गेलो होतो. त्यांची इच्छा होती की, पाठिंबा द्यायचाच असेल तर एकवेळा त्यांनी मातोश्रीला यायला हवं. मी म्हटलं ठिक आहे. शेवटी उमेदवाराला मतं मागण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजवाले लागतात. शेवटच्या क्षणी अशी अट घातल्यानंतर मी नकार दिला”, असा खुलासा राजू शेट्टी यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक न लढवण्याचा निर्णय का घेतला? याबाबत खुलासा केला. “मी कुठल्याही पक्षात गेलो नाही. निवडणूक लढवण्यासाठी कुठल्यातरी एका पक्षात असावं म्हणून आम्ही स्वाभिमानी पक्षाची निर्मिती केली आहे. असं असताना मी मशाल चिन्ह हाती घेणं म्हणजे, महाविकास आघाडीत मशाल चिन्हं हे शिवसेना ठाकरे गटासाठी आरक्षित आहे. ते चिन्हं घ्यायचं तर त्यांचा एबी फॉर्म घ्यावा लागेल, एबी फॉर्म घ्यायचा असेल तर मला शिवसेनेत प्रवेश करावा लागेल. मग मीच स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष शिवसेनेत विलीन करायचा का?”, असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.
“जी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहे तिला वाऱ्यावर सोडायचं का? सर्व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं का? मी पक्षीय राजकारण करत बसलो तर मग शेतकऱ्यांचं काय? त्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांचा सल्लाही न घेता स्पष्टपणे सांगून टाकलं की, माझ्याकडून हे होणं शक्य नाही. मी मशाल चिन्हं हाती घेणार नाही. मग त्यांनी माझा उमेदवार जाहीर केला. माझी काय हरकत नाही. पण नेमकं काय घडलं? अनेकांना असं वाटलं की एक चिन्हं तरी घ्यायचं होतं, कुठलीतरी चिन्हं घ्यावच लागणार होतं. मग तुम्ही मशाल चिन्हं का घेतलं नाही? मला लोकं विचारतात म्हणून मी हा खुलासा करतोय”, असं स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिलं.
‘खात्रीचं राजकारण करायचं असतं तर…’
“मशाल चिन्हावर निवडणूक लढवणं म्हणजे मी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणं आहे. ते मी कदापि करणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना कदापि वाऱ्यावर सोडणार नाही आणि संघटनेलाही वाऱ्यावर सोडणार नाही. कारण मला अशा पद्धतीने सोयीचं आणि खात्रीचं राजकारण करायचं असतं तर 2004 मध्ये मी पहिल्यांदा निवडून आलो आणि आमदार झालो, त्याचवेळी कुठल्यातरी मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश केला असता. मी माझं करियर स्थिर स्थावर केलं असतं. पण मी चळवळीसाठी निवडणूक लढवतो. शेतकऱ्यांसाठी निवडणूक लढवतो. पण मी चळवळीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी निवडणुका लढवतो. त्यापलीकडे मला कुठेही जाण्यात रस नाही”, असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
“उद्धव ठाकरे यांच्याकडून मला निमंत्रण आलं म्हणून मी गेलो होतो. त्यांची इच्छा होती की, पाठिंबा द्यायचाच असेल तर एकवेळा त्यांनी मातोश्रीला यायला हवं. मी म्हटलं ठिक आहे. शेवटी उमेदवाराला मतं मागण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजवाले लागतात. शेवटच्या क्षणी अशी अट घातल्यानंतर मी नकार दिला”, असा खुलासा राजू शेट्टी यांनी केला.
“माझ्या विरोधातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सत्यजित पाटील सरुडकर त्यांचे वडील गेली 20 वर्षे सांगली जिल्ह्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे वॉईस चेअरमन आहेत. त्यांच्याबाजून सर्व कारखानदार उभे राहिले आहेत. त्यामुळे कारखानदार विरुद्ध शेतकरी अशी लढाई आहे”, असं राजू शेट्टी म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी तुम्हाला फसवलं का?
पत्रकारांनी राजू शेट्टींना उद्धव ठाकरेंनी तुम्हाला फसवलं का? असा प्रश्न विचारला. त्यावर “उद्धव ठाकरेंनी मला फसवलं असं मी म्हणणार नाही. पण शब्द फिरवला असं म्हणता येईल. फसवणं असं म्हणता येणार नाही कारण मी आघाडीतच नव्हतो. तर फसवण्याचा मुद्दा येत नाही. पण अनेक शिवसैनिकांची इच्छा होती की उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांनीसुद्धा सुरुवातीला सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. पण नंतर मला माहिती आहे, सर्व साखर कारखाने परस्पर भेटले असतील. आम्हाला काटा काढण्याची संधी आली आहे ती द्या, असं म्हणाले असतील”, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.
“सांगलीचा उमेदवार कसा आहे आणि कशी निवडणूक एकतर्फी झाली ते सर्वांना माहिती आहे. मी स्वत: महाविकास आघाडीत नसेल किंवा आमची संघटना नसेल तर कशाला भाष्य करावं? पण कुठेतरी सांगलीचा निर्णय हा वसंत दादा पाटील यांचं घराणं संपवण्यासाठी घेतलाय की काय? अशी शंका निर्माण झालेली आहे”, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.