Friday, December 27, 2024
Homeब्रेकिंगसलमान खान गोळीबार प्रकरण , दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी

सलमान खान गोळीबार प्रकरण , दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी

 

अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या गुजरातमधून आवळल्या. या दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

 

अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या गुजरातमधून आवळल्या आहेत. 48 तासांच्या अर्थात दोन दिवसांच्या आतच पोलिसांनी त्यांना भुज येथून अटक केली. त्यांना आज मुंबईत आणण्यात आले आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून 25 एप्रिलपर्यंत ते पोलिस कोठडीत असतील.

 

पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी दोन आरोपींची नावे असून सागर पाल याने हा गोळीबार केला होता. दोन्ही आरोपींना कोर्टासमोर सादर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्वाचे खुलासे केले. गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांनी यासंदर्भात बरीच माहिती दिली.

 

गुन्हेगारांच्या शोधासाठी 12 पथकं तैनात

 

14 एप्रिलला पहाटे अभिनेता सलमान खान यांच्या घरी झालेल्या गोळीबाराप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच दिवशी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. या प्रकरणात 120 बी कलम वाढवण्यात आलं. सलमानच्या घरी गोळीबार करताना आरोपींनी 5 राउंड फायर केले होते, त्यापैकी एक गोळी गॅलेक्सीच्या बाल्कनीमध्येही गेली होती. बाईकवर आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 12 पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींची मिळवण्यात आली. तेव्हा ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली.

 

पोलिसांकडे आरोपींचे लोकेशन होते पण त्यांच्याकडे शस्त्र असल्याची शक्यता होती म्हणून गुजरातमधील स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. आजा त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन्ही आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई गुन्ह्यात आरोपी

 

याप्रकरणी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नावही आरोपी म्हणून नोंदवण्यात आले आहे. गोळीबारानंतर अनमोल बिश्नोईने फेसबुकवर पोस्ट करुन गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याने त्याला आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. बिश्नोई गँगशी सबंधित ज्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तिथे आम्ही चौकशी करत आहोत माहिती घेत आहोत आणि त्या तपासयत्रणांच्या संपर्कात राहून तपास करत आहोत, असे पोलिसांनी सांगितलं.

 

गोळीबार करणारा सागर पाल बिश्नोई गँगच्या संपर्कात कसा आला ?

 

सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींची नावं सागर पाल आणि विकी गुप्ता अशी असून सागर पाल याने गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. तो मूळचा बिहारचा असून दोन वर्ष हरियाणामध्ये काम करत होता. हरियाणात असतानाच तो बिश्नोई गँगच्या संपर्कात आला अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

गेल्या काही काळापासून दोन्ही आरोपी पनवेलमधल्या घरात राहत होते, तेथे राहण्यासाठी त्यांनी रूम डिपॉझिट म्हणून 10 हजार रुपये आणि 3500 रुपये हे रूम भाडे दिले होते.

 

14 एप्रिलला झाला होता गोळीबार

 

14 एप्रिल रविवारी पहाटे 5 च्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली. गोळीबार करुन गुजरामधील भुज जिल्ह्यात आरोपी पळाले होते. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी हे बिहारमधील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तातडीने पावले उचलली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तपासासाठी 20 पथके तयार केली होती. पोलीस तपासातून नवनवीन खुलासे समोर येत होते. दोन्ही आरोपींनी सलमान खानच्या घरावर चार ते पाच गोळ्या झाडल्या होत्या.

 

हल्लेखोर पनवलेमध्ये थांबले होते

 

पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीतून बरीच माहिती समोर आली आहे. हे दोघेही हल्लेखोर पनवेल परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी ते हरिग्राम येथील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन वास्तव्यास होते. तेथील घर मालकाशी केलेल्या करारनाम्याच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी नवीन पनवेलमधील एका दुचाकी शोरूममधून गाडी विकत घेतली व त्यासाठीसुद्धा त्यांनी तीच कागदपत्र सादर केली होती.

 

घरामालकाची चौकशी

 

मुंबई पोलीस, क्राईम ब्रांच, ATS व स्थानिक पोलीस यांनी आरोपींचा कसून शोध घेतला. पनवेलमधील वास्तव्य उघडकीस आल्यानंतर त्या अपार्टमेंटमधील घराचा मालक तसेच जी दुचाकी वारली त्याच्या शोरूमच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. घर मालकाचे नाव राहुल भोपी आहे. आरोपींना घर भाड्याने देताना करारनामा झाला होता का? करारनाम्यासाठी आरोपींनी दिलेली कागदपत्रे खरी होती की खोटी ? याचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांचा तपास चोहोबाजूने सुरु असताना आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

 

शूटर्स सापडले पण हत्यार नाही, पोलिसांकडून शोध सुरू

 

दरम्यान याप्रकरणी बॅलिस्टिक रिपोर्टसाठी गोळीबारासाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल मिळणं महत्वाचं आहे. माता का मढ मंदिर परिसरात कसून शोध घेतल्यावर पोलिसांनी दोन्ही आरोपींना तर अटक केली. पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सलमनाच्या घराबाहेर ज्या पिस्तूलातून गोळीबार केला, ती पिस्तुल काही पोलिसांना अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही. आरोपींच्या झडतीत कोणतेही हत्यार सापडले नाही. चौकशीत आरोपी उघडपणे काही सांगत नाहीत. गोळीबारानंतर फरार होताना आरोपींनी हत्यार कुठेतरी लपवून ठेवल्याचा किंवा फेकून दिल्याचा संशय आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात पिस्तूल शोधणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पोलिसांना जिवंत काडतूसही सापडले असून, बॅलेस्टिक अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -