आयपीएल 2024 स्पर्धा आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. पण बीसीसीआय निवड समितीला भलतीच चिंता लागून आहे. कारण पुढच्या 14 दिवसात टी20 वर्ल्डकपसाठीचा संघ फायनल करायचा आहे. या संघात कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला नाही याबाबत खलबतंत सुरु आहेत. हार्दिक पांड्यासाठीही रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात चर्चा झाली.
आयपीएल 2024 स्पर्धा सुरु असतानाच टी20 वर्ल्डकपचे वेध लागले आहेत. टी20 वर्ल्डकप संघ जाहीर करण्यासाठी 1 मे ही शेवटची तारीख आहे. म्हणजेच फक्त 14 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे संघात कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही? याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात गेल्या आठवड्यात चर्चा झाली. जवळपास दोन तास चाललेल्या या चर्चेत मुख्य मुद्दा हार्दिक पांड्याला संघात स्थान द्यायचं की नाही याबाबत होतं. टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. यासाठी जवळपास दीड महिना शिल्लक आहे. असं असलं तरी संघ व्यवस्थापनाला हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत चिंता लागून आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान जखमी झाल्याने स्पर्धेबाहेर गेला होता. त्यानंतर आता आयपीएलमध्ये पुनरागमन केलं आहे. पण हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही.
मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात 6 पैकी 4 सामने गमावले आहेत. आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात फक्त 131 धावा केल्य आहेत. आरसीबीविरुद्धची खेळी सोडली तर सर्वच पातळीवर फेल ठरला आहे. आरसीबीविरुद्ध 6 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. त्यामुळे मधल्या फळीतील धुरा कितपत सांभाळेल याबाबत शंका आहे. असं असलं तरी निवड समितीला हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीची चिंता लागून आहे. त्याच्या गोलंदाजीला हवी तशी धार दिसली नाही. त्यामुळे पांड्याला बाहेर ठेवायचं की संघात घ्यायचं हा प्रश्न आहे.
हार्दिक पांड्याने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात फक्त दोनदाच चार षटकं पूर्ण टाकली आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकही षटक टाकलं नाही. रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध फक्त एकच षटक टाकलं. चेन्नई विरुद्ध हार्दिक पांड्याने तीनच षटकं टाकली. त्यात तिसरं षटक सर्वात महागडं ठरलं. पांड्याने आतापर्यंत टाकलेल्या 11 षटकात फक्त तीन गडी बाद केले आहेत. त्याच्या गोलंदाजीत फिटनेसशी समस्या दिसत नसली तरी फॉर्मबाबत चिंता आहे.
हार्दिक पांड्याऐवजी टीम इंडियाला त्याचा पर्याय म्हणून शिवम दुबे आहे. डावखुरा शिवम दुबे फलंदाजीत मोठी फटकेबाजी करू शकतो. तसेच मध्यम गतीने गोलंदाजीही करतो. त्यामुळे अष्टपैलूची जागा भरून निघेल. पण शिवम दुबेने आयपीएलमध्ये एकही षटक टाकलेलं नाही. चेन्नई सुपर किंग्सने त्याचा वापर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून केला आहे.