Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रभयानक ! आजोबांनी नात्याला फासला काळिमा, नातीवर 10 वर्षांपासून अत्याचार; जीवे मारण्याचीही...

भयानक ! आजोबांनी नात्याला फासला काळिमा, नातीवर 10 वर्षांपासून अत्याचार; जीवे मारण्याचीही धमकी 

नात-आजोबांच्या प्रेमळ नात्यावरून विश्वास उडेल, असा घृणास्पद प्रकार मुंबईत घडला आहे. कांदिवलीमध्ये एका 58 वर्षांच्या इसमाने त्याच्याच अवघ्या 19 वर्षांच्या सावत्र नातीवर लैंगिक अत्याचार करत तिचा छळ केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा घृणास्पद प्रकार सुरू होताएवढंच नव्हे तर घडलेला प्रकार कोणाला सांगितलास तरी जीवानिशी मारेन अशी धमकीही त्या नराधमाने त्याच्या नातीला दिली. अखेर 10 वर्षांनी ही घटना उघडकीस आली असून कुरार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्या विकृत आजोबांना अटक केली आहे.

 

2014 पासून सुरू होता छळ

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी आत्ता 19 वर्षांची असून गेल्या 10 वर्षांपासून तिच्यावर अत्याचार होत आहे. म्हणजे ती जेव्हा अवघी 9 वर्षांची होती, तेव्हापासून तिला हा घृणास्पद प्रकार सहन करावा लागत आहे. आरोपी हा तिचा सावत्र आजोबा असून तिच्या शेजारच्याच घरात राहतो. 10 वर्षांनी तिने कशीबशी हिंमत गोळा करत तिच्या आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली.

 

पीडितेच्या सांगण्यानुसार, 2014 पासून आरोपी तिच्यावर अत्याचार करायचा. घरात कोणीही नाही आणि पीडित मुलगी एकटी असलाची संधी साधून तो घरात शिरायचा आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार करायचा. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, 2014 सालापासून त्याने सातत्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच तिचा शारीरिक छळही त्याने केला. एवढंच नव्हे तर घडलेल्या प्रकाराबाबत तोंड उघडंल किंवा कोणासमोरही वाच्यता केली तर तुझा जीव घेईन अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली होती.

 

सतत होणारा अत्याचार आणि आरोपीने दिलेली धमकी यामुळे पीडित मुलगी घाबरली होती. इतकी वर्ष ती हा त्रास सहन करत होती, अखेर हा त्रास असह्य झाल्यावर काही दिवसांपूर्वी तिने तिच्या आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून तिचे पालक हादरलेच. त्यांनी लगेच पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

त्यांच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. अखेर त्याला विरार येथून अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2)(एफ)(एन), 354, 354 ए, 323, 504 आणि 506 आणि लैंगिक संरक्षणाच्या कलम 4, 6, 8, 10 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -