चेन्नई सुपर किंग्सला (CSK) लखनऊ सुपर जायंट्ससमोर (LSG) काल गुडघे टेकावे लागले. पण हा सामना जोरदार रंगला. त्यात खरी रंगत आणली ती दिग्गज यष्टिरक्षक आणि स्फोटक फलंदाज महेंद्र सिंह धोनी याने. त्याने लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे धोनी-धोनी या नाऱ्यांनी अवघे स्टेडियम दणाणून सोडले. हा आवाज इतका मोठा होता की, काही स्मार्ट वॉचवर थेट धोक्याचा अलर्ट आला.
हा आवाज तर बहिरा करणार
क्विंटन डिकॉकची पत्नी ही पण स्टेडियममध्ये उपस्थित होती. प्रेक्षकांनी धोनीचा जयजयकारा सुरु केल्याने त्यांचा आवाज टिपेला पोहचला. इतका गोंगाट झाला की, तिच्या Apple स्मार्ट वॉचवर धोक्याचा अलर्ट आला. या अलर्टनुसार, त्यावेळी हा गोंगाट 95 डेसीबलपर्यंत पोहचला होता. हा स्तर धोकादायक मानल्या जातो. या गोगांटात अजून दहा मिनिटं थांबलं तर बहिरेपण आल्याशिवाय राहणार नाही, असं कॉकची पत्नी साशा हर्ले हिने तिच्या इस्टाग्रामवर लिहिले आहे. ही प्रतिक्रिया आता प्रचंड व्हायरल झाली आहे.
महेंद्र सिंग धोनीची तळपली बॅट
लखनऊ येथील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात महेंद्र सिंग धोनीवर प्रेक्षक फिदा झाले. त्याने अत्यंत स्फोटक फलंदाजी केली. धोनीने 311.11 च्या स्ट्राईक रेटने 9 चेंडूत 28 धावा चोपल्या. शुक्रवारी, 19 एप्रिल रोजी झालेल्या या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला.
क्विंटनच्या पत्नीने अनुभव केला शेअर
क्विंटन डिकॉकची पत्नी साशा हर्ले हिने मैदानातील तिचा अनुभव इस्टाग्रामवर शेअर केला. धोनी जेव्हा इकाना मैदानात फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याच्य एंट्रीने स्मार्ट वॉचवर अलर्ट आल्याचे तिने लिहिले आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा यष्टीरक्षक क्विंटन डीकॉक याची पत्नी साशाने स्वतःच्या Apple स्मार्ट वॉचवरील अलर्टचा फोटो पण शेअर केला आहे. जेव्हा धोनी मैदानात आला तेव्हा प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा जयजयकारा लावला. त्यामुळे इतका गोंगाट झाला की, स्मार्ट वॉचने धोक्याचा इशारा दिल्याचा अनुभव तिने शेअर केला आहे.





