Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडामुंबईच्या त्या दोघांना शहाणपणा नडला! मोठी कारवाई, नक्की काय झालं?

मुंबईच्या त्या दोघांना शहाणपणा नडला! मोठी कारवाई, नक्की काय झालं?

आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा थरार सुरु असताना मुंबई इंडियन्सच्या गोटातील दोघांना शहाणपणा चांगलाच नडला आहे. त्यांनी केलेल्या नको त्या हुशारीचा त्यांना आता चांगलाच फटका बसला आहे. आयपीएलने मुंबईच्या दोघांवर त्यांनी केलेल्या असमर्थनीय कृत्यासाठी कारवाईचा चाबूक फिरवला आहे. मुंबईच्या बॅटिंग कोच किरॉन पोलार्ड आणि फलंदाज टीम डेव्हिडवर दंडात्मक कारवाई केली आहे. पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात गुरुवारी 18 एप्रिल रोजी सामना पार पडला. या सामन्यादरम्यान केलेल्या चुकीमुळे या दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या दोघांना दंड म्हणून सामन्याच्या मानधनातील 20 टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.

 

नक्की काय झालं?

मुंबईच्या डावातील 15 वी ओव्हर पंजाबचा अर्शदीप सिंह टाकत होता. अर्शदीपच्या या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर स्ट्राईकवर सूर्यकुमार यादव होता. अर्शदीपने टाकलेला बॉल वाईड असल्याचा संशय होता. त्यामुळे वाईड आहे की नाही यासाठी रीव्हीव्यू घेण्याचा इशारा डगआऊटमधून करण्यात आला. डगआऊट म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळाडूंसाठी असलेली बैठक व्यवस्था. इथे डेव्हीड आणि पोलार्ड होते. या दोघांनी टीव्ही रिप्ले पाहिल्यानंतर सूर्याला हातवारे करत रीव्हीव्यू घ्यायला सांगितला.

आता डगआऊटमधून असे इशारे करुन मदत करणं कोणत्याही प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला कर्णधाराला पटणार नाही. तसंच ते पंजाबचा कर्णधार सॅम करण यालाही पटलं नाही. सॅमने पोलार्ड आणि डेव्हीडच्या या कृतीचा विरोध केला. मात्र फिल्ड अंपायर्सनी पोलार्ड आणि डेव्हिडच्या या कृतीकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर 48 तासांनी डेव्हीड आणि पोलार्डला झटका लागला आहे. दोघांना एकूण मॅच फीसच्या 20 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.

आयपीएलकडून याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, पोलार्ड आणि डेव्हीडकडून आचार संहितेच्या 2.20 नुसार लेव्हल 1 चं उल्लंघन झालं आहे. आपल्याकडून चूक झाल्याचं या दोघांनी मान्य केलं आहे. त्यामुळे दोघांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. मॅच रेफरी संजय वर्मा यांनी ही कारवाई केली आहे. सामन्यादरम्यान सर्वकाही नियमांनुसारच होत आहे की नाही, हे पाहण्याची सर्वस्व जबाबदारी मॅच रेफरी अर्थात सामनाधिकारी याच्यावर असते.

 

दरम्यान मुंबईने त्या सामन्यात पंजाबवर 9 धावांनी विजय मिळवला होता. मुंबई सध्या पॉइंट्स टेबलमध्ये 3 विजय आणि 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. मुंबईचा पुढील सामना हा 22 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -