सध्या आयपीएलचा हंगाम सुरु आहे. आयपीएलनंतर लगेच आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ही स्पर्धा सुरु होणार आहे. 1 जूनला अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या या स्पर्धेत भारतीय संघाचा (Team India) पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. हा सामना 5 जूनला होईल. तर भारताचा दुसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.
आगामी टी 20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने (Yuvraj Singh) भविष्यवाणी केली आहे. भारतीय संघ सेमी फायनलचा सामना खेळेल, असा विश्वास युवराज सिंहने व्यक्त केला आहे. भारतासोबतच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तानचा संघ सेमी फायनलपर्यंत पोहचेल, अशी भविष्यवाणी देखील युवराज सिंहने केली आहे. दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज हे संघ सेमी फायनलच्या स्पर्धेत नसतील, असंही त्याने सांगितले.
युवराज सिंह टी 20 वर्ल्डकपचा ब्रँड अँबेसिडर
टी 20 विश्वचषकासाठी आयसीसीनं युवराज सिंह याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विश्वविजेत्या युवराजला आयसीसीनं यंदाच्या टी 20 वर्ल्डकपचा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. 2007 च्या टी 20 विश्वचषकात युवराज सिंह यानं शानदार कामगिरी केली होती. युवराजनं इंग्लंडविरोधात एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा भीमपराक्रम केला होता. 2007 टी 20 विश्वचषकावर भारताने नाव कोरलं होतं. य़ामध्ये युवराजचा सिंहाचा वाटा होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत युवराजनं अमुलाग्र योगदान दिलं होतं. युवराज सिंह याचा आयसीसीनं आता सर्वात मोठा सन्मान केलाय. त्याला टी20 विश्वचषकाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केलेय. याआधी धावपटू उसेन बोल्ट यालाही ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले 20 संघ…
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
गटवारी
अ – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून – वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून – वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून – वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून – वि. कॅनडा, फ्लोरिडा