हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने रविवार २८ एप्रिल रोजी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात ५० किलोमीटर अंतराच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ६ वाजता श्री शिवतीर्थ येथून सायकल रॅलीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते करणे येणार आहे. सायकल रॅलीची सुरुवात शिवतीर्थ येथून होणार असुन त्यानंतर खोतवाडी – तारदाळ- कोरोची- कबनूर – चंदुर ते परत शिवतीर्थ असा ५० किलोमीटर प्रवास करत शिवतीर्थ येथे सायकल रॅलीची सांगता होणार आहे.
सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी स्वयंस्फुर्तीने प्रेरीत होऊन त्यांना राज्यघटनेने दिलेला पवित्र हक्क १०० टक्के बजावावा, असे आवाहन सहाय्यक निवडणुक अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले आहे.