Thursday, May 16, 2024
Homeराजकीय घडामोडीहे सर्व झूठ.. साफझूठ… खोटारडेपणाचा कळसच… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘त्या’ विधानावरून...

हे सर्व झूठ.. साफझूठ… खोटारडेपणाचा कळसच… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘त्या’ विधानावरून ठाकरेंवर हल्ला

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तरही दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. हा जावई शोध कुठून लावला माहीत नाही. हे सर्व झूठ आहे, साफझूठ. हा खोटारडेपणाचा कळस आहे… शिवसेना-भाजप युती केली असती तर यांना मुख्यमंत्री बनता आलं नसतं. त्यामुळे निकाल लागले आकडे जाहीर झाले तेव्हाच यांनी भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा आम्हाला सर्व दरवाजे मोकळे असल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. याचा अर्थ काय? फडणवीस यांनी सरकारमध्ये असताना तुमचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. त्यावेळी फडणवीस यांनी तुम्हाला 50 फोन केले. तुम्ही एकही फोन घेतला नाही. याचा अर्थ तुमच्या मनात वेगळं कारस्थान शिजत होतं. स्वत:ला मुख्यमंत्री बनायचं होतं. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घ्यायला देवेंद्रजी यांच्यासारखे अपरिपक्व नाहीत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

 

त्यांच्या मनात काय होतं?

मागच्या सरकारच्या काळात मंत्र्यांचा घातपात होणार होता अशी चर्चा आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो. सुरजागड प्रकल्प मी सुरू केला. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत होता. नक्षलवाद हटवण्यासाठी तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे ही माझी भूमिका होती. त्यामुळे मी हा मुद्दा हाती घेतला. त्यामुळे नक्षलवादी भडकले असतील. त्यांच्या मनात संताप आला असेल. मला धमक्या येत होत्या. पण मला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली नाही. त्यांच्या (उद्धव ठाकरे) मनात काय होतं माहीत नाही. कारस्थान काय होतं माहीत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

कोणत्या मूर्खाच्या नंदनवनात आहेत ?

 

आमचं सरकार आल्यावर सत्ताधाऱ्यांना ईडी लावू असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. घरात बसलेले लोक दुसऱ्यांच्या घरात काय घुसणार? आमचं सरकार येणार… कोणत्या स्वप्नात आहेत? कोणत्या मूर्खांच्या नंदनवनात आहेत? घरात बसून पंतप्रधान होता येतं का? परदेशात थंडगार हवा खायला जाऊन पंतप्रधान होता येतं का? देशाची बदनामी परदेशात करून पंतप्रधान होता येतं का? इकडे 24 तास कोणतीही पर्वा न करता जनतेसाठी मोदी काम करत आहेत. त्यांनी देशासाठी जीवन समर्पित केलं आहे. आईचं दु:ख विसरून ते कामाला लागले आहेत. अशा व्यक्तीला पंतप्रधान करणार की फेसबुक लाइव्ह करणाऱ्याला? असा सवालच त्यांनी केला.

 

म्हणून धाडस केलं

 

खरं म्हणजे मी कोणत्याही दबावाखाली काम करत नाही. तुम्ही हिंदुत्व सोडलं. विचारधारा सोडली. सत्तेसाठी तुम्ही जनतेचा विश्वासघात केला. तुम्ही शिवसेना-भाजप युतीत विश्वासघात केला. युती म्हणून निवडणूक लढलो. लग्न एकाशी केलं अन् संसार दुसऱ्याशी हे पाप तुम्ही केलं. त्यामुळे आम्ही सरकार बदलण्याचं धाडस केलं, असंही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -