मागच्या अनेक दिवसांपासून रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या दोन परंपरागत मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार? ही चर्चा सुरु होती. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी या तिघांची नाव चर्चेत होती. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी हे दोन काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ मानले जातात. या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ दिली.
फक्त मागच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीच समीकरण बदललं. इथून भाजपाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला. फिरोज गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अमेठीच प्रतिनिधित्व केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाड आणि रायबरेली.
मागच्यावेळी राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड आणि अमेठीमधून निवडणूक लढवली होती. त्यात ते अमेठी मधून पराभूत झाले होते. आता सुद्धा ते दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. एक म्हणजे वायनाड आणि दुसरा रायबरेली. राहुल गांधी हे अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. अमेठीमधून किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कदाचित पराभवाच्या शक्यतेचा मुद्दा लक्षात घेऊन उत्तर प्रदेशातील राहुल गांधी यांचा परंपरागत मतदारसंघ बदलला असावा. त्यांना सुरक्षित सीट म्हणून रायबरेलीमधून उमेदवारी देण्यात आली असावी. रायबरेलीमधून सोनिया गांधी यांनी 2004 पासून 2019 पर्यंत सातत्याने खासदारकीची निवडणूक जिंकली आहे.
राहुल गांधी कधी भरणार निवडणूक अर्ज?
राहुल गांधी आज 12.15 वाजता उमेदवारी अर्ज भरतील. सकाळी 9.20 मिनिटांनी ते विशेष विमानाने दिल्लीहून फुरसतगंजला रवाना होणार आहेत. 10.20 वाजता फुरसतगंज येथे पोहोचतील. फुरसतगंज एअरपोर्टवरुन ते रस्ते मार्गाने गेस्ट हाऊसला जातील. सकाळी 11 वाजता भुएमोऊ गेस्टहाऊसवर पोहोचतील. त्यानंतर 12.15-12.45 दरम्यान निवडणूक अर्ज दाखल करतील. त्यानंतर 2.10 मिनिटांनी फुरसतगंजवरन लखनऊला रवाना होतील.
अमेठी-रायबरेलीमध्ये मतदान कधी?
अमेठी-रायबरेलीमध्ये पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्याशिवाय आणखी 12 जागांसाठी या दिवशी मतदान होणार आहे. यात कैसरगंज, लखनऊ, फैजाबाद, मोहनलालगंज, जालौन, झांसी, कौशांबी, बाराबंकी, गोंडा, हमीरपुर, बांदा आणि फतेहपूर इथे मतदान होईल.