हुपरी येथीली कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना आणि इफको यांच्या संयुक्त सहकार्यातून कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर ड्रोन फवारणी अभिनव योजनेचा शुभारंभ तळंदगे (ता. हातकणंगले) येथे कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी इफकोचे वरीष्ठ व्यवस्थापक डॉ. एम. एस. पोवार यांनी, पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के वाटा हा पाणी, जमिन व हवामान यांचा तर 50 टक्के वाटा हा रासायनिक व सेंद्रीय खतांचा आहे. आपल्या देशात रासायनिक खतांच्या वापरात निम्याहून जास्त वाटा हा युरिया खताचा आहे. रासायनिक खत हे पारंपारीक पध्दतीने पिकाला देताना त्याची फक्त 30 टक्के कार्यक्षमता वापरली जाते आणि 70 टक्के वाया जातो. वाया जाणार्या युरियामुळे जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्ये, माती व पाणी प्रदूषीत होत आहे. यासाठी इफको कंपनीने नविन तंत्रज्ञानाचा वापर करून नॅनो युरिया व नॅनो डीएफी या द्रवरूप रासायनिक खतांची निर्मिती केली असून ती प्रभावी आहेत. ही द्रवरूप खते फवारणीद्वारेच द्यावी लागतात. पिकामध्ये उच्च कार्यक्षमतेसह फवारणीसाठी प्रशिक्षण दिले असलेने द्रवरूप खते योग्य प्रमाणात उच्च कार्यक्षमतेसह वापरली जावून उर्जा, पाणी, वेळ, श्रम आणि खर्चामध्ये मोठी बचत होवून शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहुल आवाडे यांनी, संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना स्थापनेपासून ऊस विकास योजनेच्या माध्यमातून रूंद सरी, ठिबक सिंचन, क्षारपड चोपण व खोडवा पाचट अनुदान योजना या शेतीमधील नविन तंत्रज्ञानाची सर्वात प्रथम अंमलबजावणी करून ऊस उत्पादक सभासद शेतकर्यांना कमीत कमी उत्पादन खर्चात जास्तीतजास्त उत्पादन घेणेसाठी प्रोत्साहन दिलेले आहे. कारखान्याने आजपर्यंत सुमारे 14 कोटी रूपयांचे अनुदान ऊस विकास योजनेद्वारे स्वनिधीतून दिलेले आहे. आधुनिक शेती पध्दतीमध्ये क्रांती घडवून आणणारे संशोधन म्हणजे पिकावर फवारणीसाठी तयार केलेले ड्रोन. सध्या फक्त ड्रोन फवारणीचा प्रती एकर खर्च 600 ते 700 रुपये इतका आहे. कारखाना व इफको यांच्या संयुक्त सहकार्यातून ऊस पुरवठा करणार्या सभासद व बिगर सभासदांना प्रती एकर 300 रुपये या सवलतीच्या दरामध्ये बिनव्याजी क्रेडीटवर ड्रोनद्वारे ऊस विकास योजनेतून दिले जाणारे नॅनो युरिया व इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि किटकनाशके यांची फवारणी करून दिली जाणार आहे. तरी ड्रोन फवारणी मागणीची नोंद शेती सर्कल व गट ऑफीसकडे करून या संधीचा लाभ शेतकरी बंधूंनी घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे यांनी केले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील, अभय काश्मिरे, सूरज बेडगे, शितल आम्मण्णावर तसेच शेखर पाटील, विजय कुंभोजे, संग्राम पाटील, जवाहर पाणी पुरवठा संस्थेचे सर्व संचालक, इफकोचे कोल्हापूर क्षेत्र अधिकारी विजय बुणगे, पीएम ड्रोन दीदी सौ. सिमा पाटील, कपिल पाटील यांच्यासह उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे व शेती विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवाहर पाणी पुरवठा तळंदगे संस्थेचे चेअरमन सुरेश भोजकर यांनी आभार मानले.