मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. त्यात नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्षाने पाठिंबा दिल्याची माहिती दिली जात आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Elections Result 2024) समोर आला असून, यामध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. असे असताना आकड्यांची जुळवाजुळव करताना भाजपची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातच तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी सरकार स्थापनेपूर्वी मोठी मागणी केली आहे.
लोकसभेच्या 543 जागांसाठी देशात सात टप्प्यात निवडणुका पार पडल्या. यात 4 जून रोजी मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेस किंवा भाजप कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. पण, काँग्रेसपेक्षा भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळेच भाजपकडून आकड्यांची जुळवाजुळव केली जात आहे. आता त्यांना मित्रपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. त्यात नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्षाने पाठिंबा दिल्याची माहिती दिली जात आहे.
पण आता याच टीडीपीने भाजपकडे मोठी मागणी केल्याचे म्हटले जात आहे. टीडीपीला मोदी 3.0 सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. त्यांनी आपल्या मागण्यांची यादी भाजप नेतृत्वाला दिल्याचे सांगण्यात आले. यामध्ये लोकसभा अध्यक्षपद आणि किमान पाच मंत्रालयाचा समावेश आहे. टीडीपीने अर्थ मंत्रालयासह जलशक्ती मंत्रालय यांसारखी मंत्रालयं आपल्या मिळावी, यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आग्रही
टीडीपीला लोकसभेचे सभापतिपद हवे आहे. कारण ते लोकसभेतील सर्वात शक्तिशाली पद असेल. इतकंच नाही तर त्रिशंकू संसदेच्या स्थितीत सभापती महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे त्यांच्याकडून ही मागणी केली जात आहे. याशिवाय, ग्रामीण विकास, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, बंदरे आणि जहाजबांधणी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जलशक्ती मंत्रालयाचा समावेश आहे.