गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या नियमांचे पालन न केल्याने काही बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
अशातच आता आरबीआयने एका बड्या बँकेवर मोठी कारवाई केली आहे. प्रामुख्याने आरबीआयच्या काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हीही या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला संबंधित बँकेवरील या कारवाईबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
काय आहे कारवाईमागील कारण?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याचे कारण देत हाँगकाँग आणि शांघाय बँक कॉर्पोरेशन (एचएसबीसी) या बँकेवर कारवाई केली आहे. या बँकेवर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि रुपे प्री पेड कार्ड्सबाबत कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इन्शुरन्स आणि कंडक्ट 2022 संदर्भात ही कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने एचएसबीसी बँकेला नियमांचे पालन न केल्यामुळे 29 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
काय म्हटलंय आरबीआयने आपल्या निवेदनात?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आरबीआयने एचएसबीसी बँकेला आपल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल आणि संबंधित पत्रव्यवहाराबद्दल नोटीस बजावली होती. तसेच या बँकेला आपल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे दंड का ठोठावण्यात येऊ नये, याबाबत कारणे दाखवा. असे नोटीसमध्ये बजावण्यात आले होते. बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 46(4)(i) सह कलम 47A(1)(C) च्या तरतुदींनुसार आरबीआयला प्रदान केलेल्या अधिकारांनुसार हा दंड ठोठावण्यात आला आहे.”
‘या’ बँकांवरही कारवाईचा बडगा
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एका बँकेचा परवाना रद्द केला होता. उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील पूर्वांचल सहकारी बँकेवर आरबीआयने ही कारवाई केली होती. या कारवाईबाबत आरबीआयने म्हटले होते की, “पूर्वांचल सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाई करण्याची क्षमता नाही आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँक बंद करण्याचे आणि लिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यास सांगितले होते. याशिवाय सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही आरबीआयने 1.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. आरबीआयने दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआय म्हटले होते.