मुंबई: सर्वच क्षेत्रांत महागाई वाढत चाललेली असताना देशातल्या तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाइल रिचार्ज पॅक्सच्या किमती वाढवल्या आहेत. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तिन्ही कंपन्यांनी पाठोपाठ आपली दरवाढ जाहीर केली आहे.
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल हा पर्याय ग्राहकांकडे आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीन कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे प्लॅन आजही स्वस्त आणि ग्राहकांना परवडणारे आहेत.
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या कंपन्यांचे प्लॅन्स तीन जुलैपासून, तर व्होडाफोन आयडियाचे प्लॅन्स चार जुलैपासून महाग होणार आहेत. तशी घोषणा कंपन्यांकडून करण्यात आली आहे.
रिलायन्स जिओच्या 75 जीबी पोस्टपेड डेटा प्लॅनची किंमत 399 रुपयांवरून वाढून 449 रुपये होणार आहे. 84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला 666 रुपयांचा अनलिमिटेड प्लॅन ग्राहकांच्या आवडीचा आहे. त्याच्या किमतीत 20 टक्के वाढ झाली असून, आता त्या प्लॅनसाठी ग्राहकांना 799 रुपये मोजावे लागणार आहेत. ॲन्युअल रिचार्ज प्लॅनच्या किमतीत 20-21 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे 1559 रुपयांचा प्लॅन आता 1899, तर 2999 रुपयांचा प्लॅन आता 3599 रुपयांना मिळणार आहे. रिलायन्स जिओकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
भारती एअरटेल तीन जुलैपासून प्रीपेड रिचार्ज आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ करत आहे. किमती सुमारे 20 टक्के वाढवण्यात आल्या आहेत. 84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला 719 रुपयांचा प्लॅन आता 859 रुपयांना मिळणार आहे. दररोज दोन जीबी डेटा देणारा 84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला रिचार्ज प्लॅन 839 वरून 979 रुपयांवर गेला आहे.
व्होडाफोन आयडियाने चार जुलैपासून किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रिचार्ज प्लॅन्सच्या किमती 11-24 टक्के वाढणार आहेत. 179 रुपयांचा 28 दिवस व्हॅलिडिटी देणारा प्लॅन आता 199 रुपयांना मिळेल. 459 रुपयांच्या प्लॅनची किंमत 509 रुपये झाली आहे. त्यात 84 दिवस व्हॅलिडिटी आणि सहा जीबी डेटा मिळतो.
या तिन्ही कंपन्यांच्या किमतीत वाढ होत असताना बीएसएनएल या सरकारी कंपनीने मात्र अद्याप आपल्या प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन्सच्या किमतीत बदल केलेले नाहीत. विशेष म्हणजे या तिन्ही कंपन्यांच्या तुलनेत आजही बीएसएनएलचे प्लॅन स्वस्तच आहेत. 84 दिवस व्हॅलिडिटी आणि दररोज तीन जीबी डेटा देणाऱ्या बीएसएनएलच्या प्लॅनची किंमत 599 रुपये आहे. तोच प्लॅन व्होडाफोन आयडिया आणि जिओकडे 719 रुपये तर एअरटेलकडे 839 रुपयांना आहे. या तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये मिळणारा डेटाही कमी आहे. तीन जुलैनंतर हे चित्र आणखी बदलणार आहे. 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या प्लॅनमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांची किमान 200 रुपयांची बचत होणार आहे.