माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: भाजपाच्या कार्यालयाला भेट देऊन हा राजीनामा दिला आहे.
या निर्णयानंतर आता ते लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार आहेत. भाजपाची (BJP) साथ सोडताना त्यांनी यापुढे ही मित्रांना भेटण्यासाठी येत राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सुधाकर भालेराव यांचा भाजपाला रामराम
गेल्या काही दिवसांपासून सुधाकर भालेवर हे भाजपला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा रंगली होती. भाजपाला रामराम ठोकत ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रीवादीत सामील होतील, असेही सांगितले जात होते. भालेराव यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे. आजच (11 जुलै) ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र बदलले
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात फटका बसला. या जागेवर महायुतीच्या जागा कमी झाल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागांत वाढ झाली. लोकांनी महाविकास आघाडीच्या झोळीत मते टाकली. जनतेचा हाच कल लक्षात घेता आता महायुतीच्या नेत्यांत चलबीचल चालू आहे. आता अवघ्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे राजकीय परिस्थिती लक्षात घेता अनेक नेते महाविकास आघाडीतील घटकपक्षांत जाण्याच्या विचारात आहेत. असे असतानाच सुधाकर भालेराव यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपाकडून उमेदवारी मिळणार नव्हती?
सुधाकर भालेराव हे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे. मात्र भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती, असे सांगितले जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भालेराव आता तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार असतील तर महायुतीकडून उदगीर या मतदारसंघात कोणाला तिकीट मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.