महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्या पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट झाली. आता याबद्दल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार हे या देशाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना कोणीही भेटायला जाऊ शकतं”, असे अमोल मिटकरी म्हणाले.
शरद पवारांना कोणीही भेटू शकतं
महायुतीत नाराजी असल्याने त्यांनी भेट घेतली, असं बोललं जातंय, याबद्दल अमोल मिटकरींना विचारल्यावर त्यावरही त्यांनी भाष्य केले. “हे स्वत: भुजबळ साहेबच बाहेर येऊन सांगू शकतील. शरद पवारांना कोणीही भेटू शकतं”, असेही अमोल मिटकरींनी सांगितले.
दरम्यान छगन भुजबळ हे आज सकाळी १० च्या दरम्यान शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर रवाना झाले आहेत. गेल्या तासाभरापासून छगन भुजबळ हे शरद पवारांची वाट पाहत आहेत. छगन भुजबळ हे वेळ न घेताच शरद पवार यांना भेटायला पोहोचले आहेत. आज केवळ मिलिंद नार्वेकर यांना शरद पवारांनी भेटीसाठी वेळ दिला होता. पण छगन भुजबळ हे वेळ न घेता आल्याने ते वेटींगवर आहेत. शरद पवार हे आले नसल्याने छगन भुजबळ हे त्यांची वाट पाहत बसले आहेत.
सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे महायुतीत छगन भुजबळ हे नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेले असल्याचे बोललं जात आहे.