टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाने झिम्बाब्वे दौऱ्यातही दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या नेतृत्वात(captain) खेळणाऱ्या टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत झिम्बाब्वेवर त्यांच्याच भूमीत 4-1 अशी धुळ चारली. आता टीम इंडिया सज्ज झालीय श्रीलंका दौऱ्यासाठी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार असून या दौऱ्यात भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेपासून होणार असून पहिला टी20 सामना 27 जुलैला खेळवला जाणार आहे.
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआय(captain) याच आठवड्यात टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने याआधीच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. तर एकदिवसीय मालिकेतूनही रोहित, विराट आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार आहे.
अशात श्रीलंका दौऱ्यासाठी टी20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्या, केएल राहुल, ऋषभ पंत यांची नावं चर्चेत आहेत. यात हार्दिक पांड्याचं नाव सर्वात आघाडीवर आहे.
पण आता या शर्यतीत आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दिला सुरुवात करेल. गंभीर आपल्या पसंतीच्या काही लोकांना सपोर्ट स्टाफसाठी तर काही खेळाडूंना टीम इंडियात संधी देऊ शकतो असं बोललं जात आहे. त्यामुळे गंभीरचा आवडता खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार बून शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं नाव सर्वात आघाडीवर आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्या उपकर्णधार होता. आता रोहित शर्मा टी20 तून निवृत्त झाल्याने हार्दिक पांड्याला कर्णधारपदी बढती मिळू शकते.
हार्दिक पांड्याबरोबरच केएल राहुल आणि ऋषभ पंतच नावही चर्चेत आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केअल राहुलकडे एकदिवसीय संघाची कमान सोपवली जाऊ शकते. टी20 वर्ल्ड कपमध्येही राहुलला संधी देण्यात आली नव्हती. दुसरीकडे टी20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंतनेही कमबॅक करताना दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार म्हणून बीसीसीआय त्याच्या नावाचाही विचार करु शकते.
आता टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी आणखी एका खेळाडूची शक्यता वाढली आहे. धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर टीम इंडियाचा कर्णधार बनू शकतो अशी चर्चा आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपद पटकावलं होतं. गौतम गंभीर या संघाचा मेंटोर होता. त्यामुळे कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यरचं नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटणासारखं नाही.