यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली.
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. आज आषाढी एकादशीचा सोहळा आहे. यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.
शिंदे कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र केली पूजा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी, वडिल संभाजीराव शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी “विठुरायाला चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे”, असे साकडे विठ्ठलाला घातले.
“चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे”
पांडुरंगाच्या आशीर्वादाने सलग तीन वर्षे विठ्ठलाची महापूजा करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पाऊस चांगला झाला आहे. पेरण्या झाल्या, दुबार पेरणीचे संकट नाही. यंदा मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार चांगले काम करत आहे. चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे. या राज्यातील प्रत्येक घटक सुखी आणि समृद्धी झाला पाहिजे, असे साकडं एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातले.
“वारकऱ्यांना पहिले प्राधान्य”
“73 कोटी संवर्धन जतन संवर्धन करण्यासाठी दिले. त्याचाही उपयोग होतोय. चांगलं काम होतंय. म्हणून मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज खरं म्हणजे सगळ्यांना आज आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन बंद केले नाही. ते चालू ठेवलं कारण शेवटी अठरा अठरा तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचे दर्शन घ्यायचं असतं. पण आपल्या शासकीय पूजेमध्ये दर्शन बंद केले जायचे. पण गेल्यावर्षीपासून आपलं मुखदर्शन देखील सुरु ठेवलं. व्हीआयपी लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिले प्राधान्य देण्याचं काम आपण केलंय”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.