महाराष्ट्र विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांनी आज रविवारी 28 जुलै रोजी शपथ घेतली. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.
विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे. मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबचा उल्लेख केला. त्यामुळे सध्या त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करुन मी शपथ घेतो की मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार, जय हिंद जय महाराष्ट्र”, असे मिलिंद नार्वेकर शपथ घेताना म्हणाले.
तर भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘शेवटी जय महाराष्ट्र, जय एकनाथ’ असे म्हटले. तर भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शपथ घेताना ‘जय लहूजी, जय भीम, जय संविधान’ असे म्हटले. तसेच अमित गोरखे यांनी गळ्यात जय लहूजी असं लिहिलेला एक पट्टा घातला होता. सध्या या सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.