महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील महिलांची सेतू कार्यालये आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. जुलै महिन्यांपासूनचे पैसे महिल्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. दर महिन्याला १५०० रुपये राज्य शासन देणार आहे. या योजनेसाठी १ कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याची काही तांत्रिक पडताळणी केली जात आहे. त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यात १ रुपया जमा केला जाणार आहे. हा एक रुपयाही सर्व महिलांच्या खात्यात येणार नाही. तसेच हा सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
एक कोटीपेक्षा जास्त अर्ज
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाकडे आहे. १ कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा करणार आहोत. हा १ रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
अपप्रचाराला बळी पडू नये
लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्व पात्र महिलांना जुलै महिन्यापासून हे पैसे मिळणार आहे. सध्या या प्रक्रियेला वेग घेतला आहे. आता निवडक महिलांच्या खात्यात प्रायोगित तत्वावर एक रुपया जमा केला जाणार आहे. परंतु हा सन्मान निधी नाही. सन्मान निधी लवकरच जमा होणार असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. राज्यातील माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ऑगस्ट अखेरपर्यंत अर्ज करता येणार
लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत आहे. योजनेसाठी आलेल्या अर्जांची छननी करुन महिलांच्या खात्यात पैसे सुरु होणार आहे. त्यासाठी आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र /जन्म, प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो लागणार आहे.