Thursday, November 21, 2024
Homeसांगलीसांगलीत पुराची पुन्हा धास्ती

सांगलीत पुराची पुन्हा धास्ती

कृष्णा नदीची पाणी पातळी बुधवारी सकाळी 37 फूट 6 इंचांपर्यंत खाली आली. मात्र, रात्री 8 वाजेपर्यंत पाणी 38 फूट 11 इंचावर गेले. धरण आणि नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

 

त्यामुळे सांगलीत कृष्णेची पाणी पातळी 40 ते 41 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. गुरुवार ते शनिवार तीन दिवस सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे पुराची धास्ती पुन्हा निर्माण झाली आहे.

 

पाणलोट क्षेत्रात कमी-जास्त होत असलेला पाऊस व धरणातून होणारा विसर्ग यामुळे सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी कमी-जास्त होत आहे. शनिवारी, 27 जुलै रोजी पाणी 40 फूट 5 इंच होते. त्यानंतर पाणी अतिशय धिम्या गतीने कमी होऊ लागले. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता पाणी 38 फूट 1 इंच होते. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता 37 फूट 11 इंच झाले. बुधवारी सकाळी सात वाजता 37 फूट 9 इंच, सकाळी नऊ वाजता 37 फूट 7 इंच, तर सकाळी 11 वाजता 37 फूट 6 इंचांपर्यंत खाली आले. त्यानंतर पाणी वाढत चालले. बुधवारी दुपारी अडीच वाजता 37 फूट 8 इंच, सायंकाळी साडेसहा वाजता 38 फूट 5 इंच झाले. दरम्यान, कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेकने विसर्ग सुरू होता. मात्र तो बुधवारी सकाळी 12 वाजता 11 हजार 585 क्युसेकने सुरू आहे.

 

कराडजवळ लक्षणीय वाढ

 

बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान कोयनापूल कराडजवळ 28 फूट 3 इंच पाणी होते, सायंकाळी 5 वाजता 37 फूट 9 इंच झाले. साडेदहा तासात 9 फूट 3 इंच पाणी वाढले. या कालावधीत कृष्णापूल कराड येथे 8 फुटाने पाणी वाढले. बुधवारी सायंकाळी 5 वाजता कृष्णा पूल कराडजवळ पाणी 30 फूट 1 इंच झाले. धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि विसर्ग याचा हा परिणाम आहे. सकाळी साडेसहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहे पुलाजवळ 3 फूट 2 इंच, ताकारी पुलाजवळ 6 फूट 6 इंच, भिलवडी पुलाजवळ 2 फूट 8 इंच पाणी वाढले. सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणी तीन इंचाने कमी होऊन तीन इंचाने वाढले.

 

पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला

 

पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला आहे. बुधवारी आठपूर्वीच्या मागील चोवीस तासात कोयना धरण क्षेत्रात 92 मिलीमीटर, महाबळेश्वरला 101 मिलीमीटर, नवजाला 158 मिलीमीटर पाऊस होता. चांदोली पाणलोट क्षेत्रातही 73 मिलीमीटर पाऊस झाला. दरम्यान बुधवारीही कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस होता. बुधवारी, 31 जुलै ते शनिवारी, 3 ऑगस्टपर्यंत सांगली जिल्ह्यात ग्रीन अलर्ट असला तरी सातारा जिल्ह्यात या चारही दिवशी ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे धरणात पाणी वाढणार, विसर्ग सुरू राहणार आणि नदी पाणलोट क्षेत्रातूनही जादा पाणी येणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे सांगलीत पाणीपातळी वाढणार हेही स्पष्ट आहे. सांगलीत पाणी 40 ते 41 फुटादरम्यान राहील, असा अंदाज पाटबंधारे विभागातून व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पुराची धास्ती पुन्हा निर्माण झाली आहे.

 

कोयना, चांदोलीतून विसर्ग वाढला

 

चांदोली धरणातून आठ हजार नऊ क्युसेक विसर्ग सुरू होता, तो आता 11 हजार 585 क्युसेक सुरू आहे. कोयना धरणातून 42 हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -