इचलकरंजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 51 हजार 585 अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
सर्वच लाभार्थ्यांना 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाची भेट खात्यात जमा होणार असल्याची माहिती योजना समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. त्याचबरोबर मराठीमध्ये अर्ज भरलेला असला तरी तो निकषानुसार पात्र ठरल्यास त्याला मंजूरी मिळणार असल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगितले.
’मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ इचलकरंजी विधानसभा मतदार संघ समितीची बैठक गुरुवारी समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली होती. बैठकीत समितीचे सदस्य विठ्ठल चोपडे, मोहन मालवणकर, उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी तथा सदस्य सचिव निवेदिता महाडीक आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील इचलकरंजीसह चंदूर, कबनूर, कोरोची तारदाळ, खोतवाडी या ग्रामीण भागातून दाखल अर्जांची छाननी करुन मंजूरी देण्यात आली. इचलकरंजी शहरातून 31 हजार 268 आणि पाच गावातून 20 हजार 318 असे 51 हजार 585 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी करुन त्यांना मंजूरी देण्यात आली.
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना अंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात घेतलेला आहे. त्यासाठी दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. या लाभापासून एकही पात्र लाभार्थी बहिण वंचित राहता कामा नये, यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने हे अर्ज स्विकारले जात आहेत.
या योजनेसाठी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, उत्पन्नाच्या पुराव्यासाठी रेशनकार्ड आणि बँक पासबुक आधारकार्ड लिंकिग असणे आवश्यक आहे. अनुदान हे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने त्यासाठी बँक खाते असणे बंधनकारक आहे. त्यासाठी विविध बँकांमध्ये झिरो बॅलेन्सवर खाते उघडले जात आहे. 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून त्याचदिवशी निकषास पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यात दोन महिन्याचे म्हणजेच 3 हजार रुपये जमा करुन रक्षाबंधनाची भेट दिली जाणार आहे. इचलकरंजी हे कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांचे शहर असून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी अंगणवाडी सेविकांसोबतच सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेतले जात असल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगि
तले.