चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठ भागामध्ये असलेल्या मेश्राम परिवारातील बाळाने खेळताना काजळाची डबीच गिळली. घरातील सगळेच घाबरले आणि डॉक्टरांकडे धाव घेतली, डबी श्वासनलिकेत अडकली होती त्यानंतर डॉक्टरांनी पाहा काय केलं.
घरात लहान बाळ असल्यावर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण थोडासाही हलगर्जीपणा तर अंगाशी येऊ शकतो. अशातच चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेश्राम परिवारातील सहा महिन्याच्या बाळाने काजळाची डबी गिळली होती.ही डबी त्या बाळाच्या श्वासनलिकेत अडकली होती, घरातील सगळेच घाबरून गेले होते. त्यांनी डॉक्टरकडे धाव घेतली अन् पाहा काय झालं?
नेमकं काय घडलं?
चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठ भागामध्ये असलेल्या मेश्राम परिवारातील बाळाने खेळताना काजळाची डबीच गिळली. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. चंद्रपूरच्या कान -नाक- घसा तज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांनी ती डबी अलगद बाहेर काढली. श्वासनलिकेत अडकलेली ही डबी क्लिष्ट ठिकाणी असली तरीही बाळाचा श्वास मात्र सुदैवाने सुरू राहिला, त्यामुळे बाळ बचावले.
योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. जर त्या बाळाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठीज थोडासाही उशिर झाला असता तर अनर्थ ओढविला असता. ज्या घरांमध्ये लहान मुले आहेत तिथे सहज तोंडात टाकण्यासारख्या वस्तू पसरून न ठेवण्याचे आवाहन तज्ञांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर केलं आहे.
दरम्यान, अनेकांच्या घरात पाळीव प्राणी असतात, अशा घरातील सदस्यांनीही घरात लहान मूल असेल तर काळजी घ्यायला हवी. कारण प्राण्यांचे केस मुलांच्या पोटात जाऊ शकतात, त्यामुळे लहान मूलांना घरातील प्राण्यांपासून दूर ठेवावं. कारण बाळासाठीसुद्धा ते फायद्याचं आहे. डॉक्टरही याबाबत सर्वांना काळजी घ्यायचा सल्ला देत असतात.