दमदार पावसामुळे आवक कमी झालेल्या भाजीपाल्याच्या किंमतीत आठवडी बाजारात वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान घाऊक बाजार व किरकोळ बाजारातील भाजीपाल्याच्या किमतीत मोठी तफावत जाणवत असल्याने शेतकऱ्यांकडून ७ रुपयाची पेंडी २० रुपयाला विकली जात आहे.
मेथीसह अन्य भाजीपाला दरात अशीच तफावत दिसत असल्याने शेतकरी आणि ग्राहक यांचा पिळवणूक केली जात आहे. बाजार समितीचा सेस, अडत कमिशन आदी बाबी सोडल्या तरीही दरात अधिक तफावत दिसत आहे.
महापुरामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे अशातच कर्नाटकमधून येणारा भाजीपालाही कमी झाला आहे. परंतु पालेभाज्या शेतकऱ्यांकडून कमी पैशात विकत घेऊन किरकोळ बाजारात मात्र तिप्पट दराने विक्री होत अशल्याचे दिसून येत आहे. लहरी हवामानामुळे सर्वाधिक फटका भाजीपाल्याला बसतो. त्यातून उत्पादन घेऊन त्याची बाजारात मातीमोल दराने विक्री करावी लागते. दहा रुपयांनी भाजीपाला महागला की सगळीकडेच आकांडतांडव सुरू होते.
परंतु भाजीपाल्याचे उत्पादन घेणे मोठे कठीण काम बनले आहे. भाजीपाला काढणीसाठी येणारा उत्पादन खर्च व बाजारात मिळणारा दर याचे गणित शेतकऱ्यांना बसणे कठीण झाले आहे. शिवारातून भाजीपाला काढून आणायचा, बाजारात मिळेल त्या दराने विक्री करुन घरी जायचे, एवढेच त्याच्या हातात आहे.
मेथीची पेंढी घाऊक बाजारात सरासरी ७ रुपयांना आहे, पण तीच पेंढी ग्राहकाच्या हातात २० रुपयांना पडते. एवढी तफावत कशी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. बाजार समितीचा १ टक्का सेस, अडत व वाहतूक खर्च धरला तरी पेंढीमागे १३ रुपयांची तफावत खूपच आहे.