हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस अधिक झाला आहे. तर 15 ऑगस्टनंतर राज्यातर पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
महिनाअखेरपर्यंत पावसाचा जोर वाढणार
सध्या जरी राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी उद्यापासून म्हणजे 15 ऑगस्टपासून पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो असं हवामान विभागानं सांगितलं आहे. 22 ऑगस्टपर्यंत हळूहळू पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहील अशी माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस अधिक झाल्यानं शेतकरी समाधानी झाले आहेत. तर जादा पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी अडचणीत देखील आले आहेत. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
पुणे विभागातील बहुतांश धरणे आता भरत आली असून भाटघर, वीर आणि उजनी धरण 100% ने भरले आहे. निरा देवघर धरणात 97.20%, चाकसमान 99.02%, पवना 95.27%, खडकवासला 81.43%, पानशेत 99.13%, डिंभे 83.79 टक्क्यांनी भरले आहे. सध्या या सर्व धरणांमधून विसर्ग सुरू असून मुळा,मुठा, भीमा, मीरा नदीपात्रात पाण्याची आवक होत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर मधील धरणांची ही स्थिती सध्या चांगली असून बहुतांश धरणे 80 टक्क्यांच्या पुढे गेली आहेत. कोल्हापूरचा दूधगंगा प्रकल्प 85.95 टक्क्यांनी तर राधानगरी 97.82 टक्के भरला आहे.