जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादाविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या दरम्यान जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याच्या 48 राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन शहीद झाले. भारतीय सैन्याकडून ही माहिती देण्यात आलीय. चार दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सुरक्षापथकांनी शिवगढ़-अस्सर बेल्टमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांच्या एका गटाला घेरलेलं. सोबतच त्या भागात शोध मोहीम सुरु होती. घनदाट जंगल असल्याने जवानांना अडचणींचा सामना करावा लागतोय. मिळालेल्या माहितीनुसार, एन्काऊंटरमध्ये एक नागरिक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जवानांना दहशतवाद्यांकडे असलेली एम-4 रायफल आणि 3 बॅग मिळाल्या आहेत. पटनीटॉपला लागून असलेल्या जंगलात ही चकमक सुरु झालेली. भारतीय सैन्याने ऑपरेशन अस्सर असं या मोहिमेला नाव दिलं आहे.
सकाळी 7.30 वाजता पुन्हा गोळीबार
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, दहशतवादी अस्सर येथे एका नदीजवळ लपले आहेत. सुरक्षापथकं आणि दहशतवाद्यांमध्ये थांबून-थांबून गोळीबार होत आहे. रात्रीच्यावेळी सुद्धा जवान तिथे होते. सकाळी उजेड होताच पुन्हा शोध मोहिम सुरु झाली. आज सकाळी 7.30 वाजता पुन्हा गोळीबाराचा आवाज झाला.
हाय लेवल बैठकीला कोण-कोण?
जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी दिल्लीत हाय लेवल बैठक सुरु आहे. संरक्षण सचिव गिरिधर अरमाने, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल, सैन्य प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, सैन्य संचालन महानिदेशक-लेफ्टिनेंट जनरल प्रतीक शर्मा आणि अन्य सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख उपस्थित आहेत. साऊथ ब्लॉकमध्ये ही बैठक झाली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.