भारतीय संघाला अखेर नवा बॉलिंग कोच मिळाला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पारस म्हाब्रेचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यात साईराज बहुतुलेकडे तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली होती. दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्केलला बॉलिंग कोचची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोर्ने मॉर्कल भारतीय संघांच्या प्रशिक्षपदी विराजमान झाल्याची बातमी क्रिकबझने जय शाह यांच्या माहितीनुसार दिली आहे. मोर्ने मॉर्केल हे टीम इंडियाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक असतील आणि 1 सप्टेंबरपासून ते आपली जबाबदारी स्वीकारेल. मॉर्केल यापू्र्वी पाकिस्तान संघाचा बॉलिंग कोच राहिला आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खराब कामगिरी केल्यानंतर पदावरून दूर झाला होता. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससोबत मोर्ने मॉर्केलने काम केलं आहे. गौतम गंभीरसुद्धा लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक राहिला आहे. गंभीर केकेआरचा कर्णधार असताना मॉर्केल संघात होता. त्यामुळे गौतम गंभीर आणि मॉर्केल यांचं चांगलं जमतं
बॉलिंग कोचसाठी विनय कुमार आणि झहीर खान यांचं नाव चर्चेत होतं. पण या दोन नावांवर मात करत मॉर्केलने बाजी मारली. पाकिस्तानचं प्रशिक्षकपद सोडल्यानंतर मॉर्केल सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत ऑस्ट्रेलियात राहात आहे. मॉर्केलला कोचिंग स्टाफमध्ये घेण्यात बऱ्याच अडचणी आल्या. कारण बीसीसीआय कोचिंग स्टाफमध्ये विदेशी व्यक्ती घेण्यास उत्सुक नव्हती. रवि शास्त्री आणि राहुल द्रविडच्या कार्यकाळात कोचिंग स्टाफमध्ये एकही विदेशी व्यक्ती नव्हती. पण आता मोर्ने मॉर्केलला हिरवा कंदील मिळाल्याचं दिसत आहे.
दरम्यान, राहुल द्रविडसोबत सपोर्ट स्टाफमध्ये असलेल्या बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे, फिल्डिंग कोच टी दिलीप आणि बॅटिंग कोच विक्रम राठोर यांचा कार्यकाळ संपला आहे. पण फिल्डिंग कोच टी दिलीप यांचा कार्यकाळ वाढवण्यास बीसीसीआय इच्छुक असल्याचं दिसत आहे. दरम्यान मॉर्ने मॉर्केल कसोटीत दक्षिण अफ्रिकेसाठी 86 सामने खेळला असून 160 डावात 309 विकेट घेतल्या आहेत. 117 वनडे सामन्यातील 114 डावात 188 विकेट, तर 44 टी20 सामन्यात 47 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 70 सामन्यात 77 विकेट्स नावावर आहेत. मॉर्केल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला आहे.