Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रछत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे आणि मनोज जरांगे एकत्र येणार? महाराष्ट्राचं राजकीय समीकरण...

छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे आणि मनोज जरांगे एकत्र येणार? महाराष्ट्राचं राजकीय समीकरण बदलणार?

महाराष्ट्राच्या सध्याच्या घडीला प्रचंड घडामोडी घडत आहेत. देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला हवं तसं यश आलेलं नाही. महायुतीच्या पराभवामागे काही कारणे आहेत. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी महायुतीच्या पराभवाला कारणीभूत आहेच, पण त्यासोबत आणखी एक महत्त्वाचं कारण महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरलं आहे. राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषण केलं. मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारकडून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आलं. पण ते आरक्षण मनोज जरांगे यांना मान्य नाही. मनोज जरांगे सगेसोयरे आणि ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहेत. पण त्यांची ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. यामुळे राज्यातील मनोज जरांगे यांचं समर्थन करणारा मराठा समाज हा महायुतीवर नाराज आहे. त्याचाच फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला.

 

लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक पक्ष विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखत आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे देखील आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी सत्ताधारी पक्षांना मोठा इशारा दिला आहे. सरकारने आरक्षणाबाबतच्या आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर आपण विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करु आणि महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. हा इशारा सत्ताधारी भाजप आणि महायुतीमधील इतर घटक पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. कारण मनोज जरांगे यांनी खरंच मराठा उमेदवार उभे केले तर महायुतीला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

मनोज जरांगे आणि संभाजीराजे यांच्यात चर्चा काय?

विशेष म्हणजे छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज तथा राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. ही संघटना राज्यातील अनेक भागांमध्ये हातपाय पसरत आहे. असं असताना आता संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीत मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे आणि मनोज जरांगे यांची राजकीय मैत्री झाली तर आगामी काळात अनेक नवे राजकीय समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, संभाजीराजे यांच्या भेटीआधी मनोज जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “संभाजीराजे आल्यानंतर चर्चा होईल. त्यानंतर मी सांगेन. सगळ्यांची इच्छा आहे. सगळ्यांना वाटतं, सध्या बदलाची शक्यता आहे. कोणी पण येऊ शकतो ही चर्चा आहे. आमची युती होणार की नाही होणार? याआधी चर्चेला काहीच अर्थ नाही. आत्ताशी ते येणार आहेत. हा विषय 29 तारखेनंतरचा आहे. आता फक्त चर्चा आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

 

मनोज जरांगे यांच्या प्रतिक्रियेनंतर संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत मराठा आरक्षण आणि आगामी राजकीय भूमिकांबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -