राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतरची दुसरी महत्त्वकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. यात लाडक्या बहिणीला वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहेत. याचा शासन अध्यादेश 30 जुलैला निघाला. मात्र, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना वगळली तर बहुतांश गॅस कनेक्शन हे घरातील पुरुषांच्या नावे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 70 टक्क्यांपेक्षा अधिक महिला यापासून वंचित राहणार आहेत. अशीच परिस्थिती ही राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील आहे. त्यामुळे यावर सरकार काय तोडगा काढणार? याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे महिलावर्ग आनंदात असताना आता राज्य सरकारने त्यांना आणखी एक भेट दिली होती. राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (mukhyamantri annapurna yojana) व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभ लागू झाले होते. त्यानुसार लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळण्याचा मार्ग खुला झाला होता. त्यानुसार राज्य सरकार लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलिंडरसाठी 830 रुपयांचे अनुदान देणार आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजना
पात्र लाभार्थी- 3 लाख 23 हजार 878
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
पात्र लाभार्थी- 4 लाख 60 हजार महिला
70 टक्क्यांपेक्षा अधिक महिला राहणार वंचित
वंचित राहणाऱ्या लाडक्या बहिणींचा टाहो
यवतमाळच्या उज्वला वाघमारे यांनी महायुती सरकारच्या तीन गॅस सिलिंडर रिफिल मोफत देण्याच्या योजनेबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र, याबरोबर त्यांना एक चिंताही सतावतेय गॅस कनेक्शन हे पतीच्या नावावर आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न सतावत आहे.
सीमा भारतनेवारे यांनीही अशीच चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे पती बांधकाम कामगार आहेत. त्यांनी सांगितले की, आमच्या घरात 5 जण असून वर्षाला 7 गॅस सिलिंडर लागतात. मात्र, गॅस कनेक्शन हे पतीच्या नावावर असल्याने आमच्यावर अन्याय का? आम्हालाही तीन सिलिंडर मोफत मिळायला पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. यावर सरकार काय तोडगा काढणार, हे बघावे लागेल.