जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यापूर्वी लडाखसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयने केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. आता लडाखमध्ये दोन ऐवजी पाच जिल्हे असणार आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग यांचा समावेश आहे.
लडाखमधील लोकांना नवीन संधी मिळणार
लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल माहिती देताना गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर लिहिले आहे की, विकसित आणि समृद्ध लडाख तयार करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यानुसार गृह मंत्रालयाने केंद्रशासित लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे असणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासन बळकट केल्याने तळागाळातील अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. लडाखमधील लोकांसाठी संधी निर्माण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे.
कलम 370 हटवले हटवले अन्…
भारत सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये असलेले कलम 370 हटवले होते. त्यानंतर जम्मू-कश्मीर आणि लडाख वेगवेगळे केले होते. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा दिला तर लडाख केंद्रशासित प्रदेश ठेवले. त्यापूर्वी लडाख हा जम्मू-काश्मीरचा भाग होता. सध्या लडाखमध्ये दोन जिल्हे आहेत. लेह आणि कारगिल हे दोन जिल्ह्यांच्या प्रदेशात आता नवीन पाच जिल्हे झाले आहेत. त्यामुळे लडाख सात जिल्ह्यांचा प्रदेश झाला आहे.
नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्रालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मोदी यांनी लडाखमध्ये पाच जिल्हे निर्माण करण्याचा गृहमंत्रालयाच्या निर्णयाचे कौतूक करत म्हटले की, लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासन अधिक गतीमान होणार आहे. लडाखच्या समृद्धीच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे. या भागावर आता अधिक लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना अधिक संधी मिळणार आहे. या भागातील लोकांचे अभिनंदन…