अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली होती.
आई झाल्यानंतर दीपिका तिच्या पती आणि बाळासह नव्या घरात राहायला जाणार असल्याचं कळतंय. दीपिका आणि रणवीर सिंह हे त्यांच्या नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार आहेत. हे घर अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याच्या शेजारीच आहे.
‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर सिंहने त्याचे वडील जगजीत सिंह भवनानी यांच्या कंपनीसोबत मिळून एक आलिशान सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केलंय. या अपार्टमेंटची किंमत तब्बल 110 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. किंग खानच्या ‘मन्नत’ जवळच हे अपार्टमेंट आहे.
रणवीर-दीपिकाचं हे अपार्टमेंट इमारतीच्या 16 व्या आणि 19 व्या मजल्यावर आहे. 11,266 चौरस फुटांवर पसरलेल्या या अपार्टमेंटला एक प्रायव्हेट टॅरेससुद्धा आहे. याआधी रणवीर आणि दीपिकाने अलिबागमध्ये 22 कोटी रुपयांना एक बंगला खरेदी केला होता.
गरोदरपणात दीपिकाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतोय. तिने फेब्रुवारी महिन्यात गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. मात्र त्यानंतर बेबी बंप दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. इतकंच नव्हे तर जेव्हा दीपिका बेबी बंपसह दिसली, तेव्हासुद्धा ते ‘फेक’ असल्याची टीका काहींनी केली.