Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर हिवाळ्यात प्रथमच राजापूर, म्हैसाळ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर हिवाळ्यात प्रथमच राजापूर, म्हैसाळ बंधारे पाण्याखाली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपल्याने नद्यांची पातळी वाढली असून कृष्णा नदीवरील म्हैसाळ व राजापूर हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पंचगंगा नदीपात्रात 3 हजार क्युसेक पाणी मिसळत असल्याने त्यामुळे शिरोळ आणि तेरवाड बंधारे रात्री पाण्याखाली जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात बंधारे पाण्याखाली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. तर ऊसतोड मजुरांच्या खोपट्यातच पावसाचे पाणी शिरल्याने त्यांचे हाल होत आहे. पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेपेक्षा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. या बंधार्‍यांवर सुमारे दीड फूट पाणी आहे. पाण्याला मोठा प्रवाह असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

म्हैसाळ बंधार्‍याची पाणी पातळी 25 फुटापर्यंत पोहोचली असून बंधार्‍यावरून 5 हजार 250 क्युसेक पाणी राजापूरकडे जात आहे. तर राजापूर बंधार्‍याची पाणी पातळी 17 फुटांवर पोचली असून बंधार्‍यावरून 8 हजार 500 क्युसेक पाणी कर्नाटकात वाहत आहे. सध्या कोणत्याही धरणातून पाणी विसर्ग सुरू नसताना केवळ नदी पाणलोट क्षेत्रातील पाण्यामुळे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वास्तविक राजापूर बंधार्‍यातील पूर्वेकडील पात्रात हिप्परगी डॅमचे बॅकवॉटर आहे. डॅममधून मार्चअखेर पाणी सोडले जात नाही. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर शेती व पिण्यासाठी म्हणून पाणी सोडले जाते. त्यामुळे राजापूर बंधार्‍यात हिप्परगीच्या पाण्याची दोन फूट फूग आहे, असे अभियंता रोहित दानोळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -