Tuesday, September 26, 2023
Homeक्रीडाखराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेचं उपकर्णधारपद धोक्यात, दोन खेळाडू शर्यतीत

खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेचं उपकर्णधारपद धोक्यात, दोन खेळाडू शर्यतीत

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज अशी ओळख असलेल्या अजिंक्य राहणेचं कसोटी करिअर धोक्यात आलं आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने अजिंक्य रहाणेच्या दुखापतीचं कारण सांगत त्याला संघातून वगळलं आहे. मात्र क्रिकेटरसिकांमध्ये अजिंक्य रहाणेला संघ व्यवस्थापनाने डच्चू दिल्याचीच अधिक चर्चा आहे. कानपूर येथील कसोटी सामन्यात राहणे कर्णधारपद संभाळताना दिसून आला, मात्र त्याला मुंबईतील कसोटीत स्थान मिळवता आलं नाही. पहिल्या कसोटी सामन्यावेळी कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली होती, त्यामुळे टीमची धुरा राहणेकडे दिली होती. शिवाय राहणेला विराट कोहलीच्या अनुपस्थित कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा चांगला अनुभवही आहे. 

अजिंक्य रहाणेचे उपकर्णधारपदही धोक्यात असल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पीटीआयने आपल्या वृत्तात लिहिले आहे की, खराब फॉर्ममुळे रहाणेला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत प्लेईंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही आणि त्यामुळे त्याच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपदही अडचणीत आलं आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा संघात परतल्यानंतर अजिंक्य रहाणेला त्याचं उपकर्णधारपददेखील गमवावं लागू शकतं. विराट कोहली संघात परत आला आहे आणि यादरम्यान शुभमन गिल, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर यांनीही चांगल्या धावा केल्या आहेत, ज्यामुळे रहाणेला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं अवघड झालं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाली असली तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा उपकर्णधारपदाचे प्रबळ दावेदार आहे. तसेच के. एल. राहुलदेखील या शर्यतीत आहे. राहुल टी-20 संघाचा उपकर्णधार आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र