राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी(decision) अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती. परंतु अनेक महिलांनी अद्याप अर्ज केला नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज नोव्हेंबर अखेरपर्यंत स्वीकारण्याची शक्यता असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी शक्यता आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार ३१ ऑगस्टपर्यंत राज्यभरातून सुमारे २.२६ कोटी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर तब्बल २.१ कोटी अर्ज स्वीकारण्यात आलेत. १ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना दोन महिन्यांसाठी तीन हजार रुपये आधीच मिळाले आहेत. अनेक लाभार्थींकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना पुन्हा अर्ज करावे लागले.
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अर्ज आलेत. सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्त लवकरात लवकर अर्ज निकाली काढण्यासाठी काम करत आहेत, अशी माहिती महिला आणि बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिली होती. सरकारी आकडेवारीनुसार लाभार्थ्यांकडून मोबाईल ॲपद्वारे सुमारे १.४ कोटी अर्ज प्राप्त झालेत, तर पोर्टलद्वारे सुमारे ८५ लाख अर्ज आलेत. कागदपत्रे नसलेले किंवा आधार बँक खात्याशी लिंक नसलेले अर्ज पुन्हा नोंदणी केल्यानंतर विचारात घेतले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.


