भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह हे डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) प्रमुखपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. पण, हा पदभार स्वीकारताच जय शाह यांचं टेंशन वाढणार असल्याचे चित्र आहे.
जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीची पहिलीच स्पर्धा पाकिस्तानमध्ये नियोजित आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाला तिथे जाण्यास तयार करण्याची जबाबदारी जय शाह यांच्यांवर असणार आहे आणि त्यासाठी त्यांना देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. जय शाह यांच्या नेत्वृत्वाखालील ICC ची ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे.
BCCI ने फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारवर सोपवला आहे. सध्यातरी सरकार भारतीय संघाला पाकिस्तानात खेळण्यासाठी जाण्याची परवानगी देण्याच्या कोणत्याच मूडमध्ये नाही. BCCI ने याबाबत केंद्र सरकारकडे कोणतीच विनंती केलेली नाही आणि त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) टेंशन वाढले आहे. पण, आता ICC चे प्रमुख म्हणून जय शाह यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात सध्यातरी कोणतीच चर्चा नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही सरकारच्या निर्देशाचे पालन करणार आहोत. त्यामुळे पाकिस्तान दौऱ्यावर जायचं की नाही, हे आमच्या हातात नाही. आयसीसी प्रमुखपदावर बसल्यावर जय शाह यांच्यासाठीही ही आव्हानात्मक गोष्ट असणार आहे, परंतु त्यांना परिस्थिती माहित आहे आणि भारताचे सामने तटस्थ ठिकाणी होतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण, आयसीसी प्रमुख म्हणून त्यांना गृहमंत्री अमित शाह आणि सरकारकडे परवानगीसाठी प्रयत्न करावे लागतील,”असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने InsideSport ला सांगितले.
”भारतीय संघाशिवाय आयसीसीच्या स्पर्धा होणे अवघड आहेत, स्पर्धा व्हावी ही आमची इच्छा आहे. हे खेळासाठी चांगले आहे, परंतु आमची भूमिका ठाम आहे. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी व्हावी, अशी विनंती आम्ही आयसीसीला केली आहे,”असेही सूत्रांनी सांगितले