७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होणार असून आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई- पुण्यातील अनेक चाकरमानी आपल्या मूळ गावी जाऊन गणरायाचे स्वागत करत असतात आणि या सणाचा आनंद लुटत असतात. आता राज्य सरकारकडून सुद्धा या गणेशभक्तांना खास गिफ्ट देण्यात आलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी (Free Toll) देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना टोल माफ (Free Toll) करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच केली होती, परंतु या घोषणेला १० -१५ दिवस उलटून सुद्धा त्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला नव्हता, मात्र आता सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार, मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. त्यासाठी सदर प्रवाशांकडे पास असणे आवश्यक आहे.
कुठे मिळणार पास?
कोकणात जाण्यासाठी टोल माफी मिळवण्यासाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास असणे आवश्यक आहे. त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश सरकार कडून देण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळे डबल डबल पास काढण्याची आवश्यकता लागणार नाही.