मात्र, चाहतावर्ग वाढल्याने अलीकडे घरातल्या सदस्यांच्या चुका प्रेक्षक फार बारकाईने पाहत आहेत. सहाव्या आठवड्यात घराच्या कॅप्टन वर्षा उसगांवकर होत्या. त्यांच्या कार्यकाळात निक्कीने घरात प्रचंड भांडणं केल्याचं पाहायला मिळालं.
निक्कीने घरातील कामं करण्यास स्पष्ट नकार दिला होता. किचनशिवाय कोणतीही ड्युटी करणार नाही या मतावर निक्की ठाम होती. यावर जान्हवीने तिला ( निक्कीला ) दुपारचं जेवण द्यायचं नाही असा निर्णय घेतला होता. आता सातव्या आठवड्यात घराच्या कॅप्टनपदी बहुमताने सूरजची निवड करण्यात आली आहे. ‘टीम B’सह निक्की-अरबाजने देखील सूरजच्या कॅप्टन्सीसाठी पाठिंबा दिला होता. यानंतर तरी घर शांत राहील अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, घडलं काहीतरी वेगळंच…सूरज कॅप्टन झाल्यावर अगदी पहिल्याच दिवशी चहा बनवण्यावरून आर्या आणि निक्कीमध्ये जोरदार भांडणं झाली.
निक्कीने स्वत:साठी केलेल्या चहाची भांडी घासण्यास नकार दिला. त्यामुळे घरात मोठी वादावादी झाली. आर्याने नंतर ही भांडी उचलून निक्कीच्या बेडवर ठेवली. तरीही निक्की ऐकली नाही म्हणून आर्याने शेवटी उरलेली भांडी उचलून लपवली. यानंतर झालेल्या भांडणात निक्कीने आर्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली. यावर आर्याने प्रचंड संतापून “बाप काढायचा नाही…” असं तिला सांगितलं. सूरजने देखील आर्याला पाठिंबा दिला. या भांडणाबद्दल नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “बिगबॉस निक्कीने आर्याचा बाप काढला आता बघू काय होतंय…रितेश सर लक्ष द्या” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र, इतक्यात भाऊच्या धक्क्याचा नवीन प्रोमो टेलिव्हिजनवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर निक्कीची चांगलीच वरात निघणार आहे. घरात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल रितेश निक्कीला जाब विचारणार नाही. घरात कोणाचाही बाप काढायचा नाही असं स्पष्ट शब्दांत सांगत रितेशने निक्कीला मोठी शिक्षा सुनावल्याचं नव्या प्रोमोमध्ये ( Bigg Boss Marathi 5 ) पाहायला मिळालं.
रितेश तिला म्हणाला, “इथून पुढे तुम्ही कधीच या घराच्या कॅप्टन होऊ शकत नाही.” अर्थात भाऊच्या धक्क्यावर निक्कीला आणखी शिक्षा देणार असल्याचं देखील रितेशने यावेळी सांगितलं आता ही दुसरी शिक्षा कोणती असेल याचा उलगडा धक्क्यावरच होईल. मात्र, आता इथून पुढे निक्की तांबोळी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची कॅप्टन होऊ शकत नाही. दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर रितेश निक्की सोडून आणखी कोणाची शाळा घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.