आज अनंत चतुर्दशी आहे. लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जात आहे. बाप्पाचं विसर्जन करण्याआधी गणेशभक्तांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. लालबागचा राजाच्या दर्शनासाठीही आज गर्दी पाहायला मिळाली. यावेळी एक चिठ्ठी बाप्पाच्या चरणी ठेवण्यात आली. यात आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळावं, यासाठी प्रार्थना करण्यात आली आहे. बाप्पा, माझ्या नेत्याला आमदार कर…, अशी प्रार्थना लालबागचा राजाच्या चरणी करण्यात आली आहे.
लालबागचा राजाच्या चरणी चिठ्ठी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 2024 चा शिवडी विधानसभा आमदार सुधीर भाऊ साळवी चिठीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. आज पहाटे सुधीर साळवी समर्थकांकडून राजाच्या चरणी चिठ्ठी ठेवण्यात आली. शिवडी विधानसभेमध्ये सध्या अजय चौधरी ठाकरे गटाकडून आमदार आहेत. अजय चौधरी यांच्यासोबतच सुधीर साळवी देखील शिवडी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता अजय चौधरी की सुधीर साळवी कोणाला दिली संधी दिली जाणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सुधीर साळवी कोण आहेत?
सुधीर साळवी हे शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते आहेत. सुधीर साळवी हे शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. तर लालबागचा राजाचे मानद सचिव देखील सुधीर साळवी आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी ते इच्छुक आहेत.