भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा इतिहास रचला. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची तुफान घौडदौड सुरू आहे. तर मध्यंतरी गुंतवणूकदारांना आचके-गचके पण बसले. पण अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर बाजारावर परिणाम दिसणार हे निश्चित होते. इतर काही घडामोडींचा सकारात्मक परिणाम दिसून आला. सेन्सेक्स पहिल्यांदाच 84,159.9 आणि निफ्टी 25,692.70 या उच्चांकावर पोहचला. या घडामोडींमुळे गुंतवणूकदार आनंदून गेला आहे.
नवीन रेकॉर्ड नावावर
या वर्षभरात शेअर बाजाराने एका मागोमाग एक रेकॉर्ड नावावर केला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा एकदा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सने यापूर्वी 83805.26 हा उच्चांक गाठला आहे. तर निफ्टीने 25,610.10 अंकाचा पल्ला गाठला आहे. आज सेन्सेक्स 561 अंकांच्या उसळीसह 83,746 अंकावर पोहचला तर निफ्टी 164 अंकांच्या दमदार कामगिरीसह 25,579 अंकावर व्यापार करत आहे. निफ्टी टॉप गेनरमध्ये जेएसडब्ल्यू स्टील, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, टाटा स्टील आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश आहे.
विक्रमानंतर बाजाराने घेतली थोडी विश्रांती
रेकॉर्डतोड फलंदाजीनंतर शेअर बाजाराची चाल थोडी मंदावली. सेन्सेक्स 110 अंकांच्या उसळीसह 83,295 अंकावर व्यापार करत आहे. जेएसडब्ल्यू स्टील 3 टक्क्यांनी वधरुन 975.60 रुपयांवर ट्रेड करत आहे. टाटा स्टील 1.40 टक्के वाढून 151.70 रुपयांवर व्यापार करत आहे. तर टायटन, एनटीपीसी, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टिसीएस, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरला या लाटेत टिकता आले नाही.
जागतिक बाजारात तेजीचे सत्र
भारतच नाही तर जगातील अनेक बाजारात तेजीचे सत्र सुरू आहे. अमेरिकेपासून ते जपानपर्यंतच्या शेअर बाजारात सध्या तुफान आले आहे. गुरुवारी सुद्धा शेअर बाजारात तेजीचे सत्र दिसून आले. तर अमेरिकन बाजारात पण तेजी दिसली. सेन्सेक्स-निफ्टीनंतर वॉल स्ट्रीटमध्ये डॉऊ जोन्स, एसअँडपी 500 उच्चांकी स्तरावर दिसून आले. या दमदार कामगिरीमुळे आशियातील बाजारात उत्साह दिसून आला. भारत, सिंगापूर, दक्षिण कोरियासह सर्वच बाजार तेजीच्या हिंदोळ्यावर दिसले. गुंतवणूकदारांनी सणासुदीत कमाईचा उत्सव साजरा केला.