भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात बांग्लादेश विरुद्ध विजयी सलामी दिली. टीम इंडियाने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला. भारताने बांगलादेशला पहिल्या डावातील 227 धावांच्या आघाडीच्या मदतीने दुसऱ्या डावात 274 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशला 515 धावांचं आव्हान मिळालं. मात्र बांगलादेशने भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.
बांगलादेशचा दुसरा डाव हा चौथ्या दिवशी 234 धावांवर आटोपला. टीम इंडियाने अशाप्रकारे 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेणारा लोकल बॉय आर अश्विन हा ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराचा मानकरी ठरला. भारताच्या या विजयानंतर बीसीसीआयने झटपट मोठी घोषणा केली आहे.
बीसीसीआय निवड समितीने बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. निवड समितीने दुसऱ्या सामन्यासाठी कोणताही बदल केलेला नाही. निवड समितीने त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवत संघ कायम ठेवला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. इंडिया बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना हा 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कानपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद नाहिद राणा, महमुदुल हसन जॉय, जाकेर अली, खालेद अहमद, तैजुल इस्लाम आणि नईम हसन.