शेअर बाजाराने पुन्हा एकदा नवीन विक्रम नावावर केला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने मैलाचा दगड गाडला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच 85 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी लांब उडी नंतर सेन्सेक्स थोडा चाचपडला. तर निफ्टी 26 हजार अंकांचा टप्पा गाठण्यासाठी कसरत करत आहे. अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याज दरात 0.50 टक्क्यांची कपात केल्याने शेअर बाजारात तुफान तेजी दिसून आली. जवळपास तीन व्यापारी सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने 2 टक्क्यांहून अधिकची उडी मारली आहे. येत्या काही दिवसात हे दोन्ही निर्देशांक तेजीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीवर दबाव दिसला. पण अगदी थोड्याच कालावधीत बाजाराची तुफान घौडदौड सुरू झाली. दोन्ही निर्देशाकांची धावाधाव दिसली. दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहचले. सेन्सेक्स व्यापारी सत्रात 100 हून अधिक अंकांच्या तेजीसह 85,052.42 अंकावर पोहचला. त्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी सेन्सेक्स 90 अंकंच्या तेजीसह 85,016.35 अंकांवर होता. तर सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 84,860.73 अंकांवर उघडला.घौडदौडीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सध्या पडझडीचे सत्र सुरू झाले आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सर्वात जास्त 3.50 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर हिंडाल्कोचा शेअर जवळपास 3 टक्क्यांच्या तेजीसह व्यापार करत आहे. जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. PowerGrid च्या शेअरमध्ये 1.66 टक्के आणि HDFC Bank चा शेअर 0.79 टक्क्यांनी वधारला होता. बीएसईवर महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, सनफार्माच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले.
दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील काही शेअरमध्ये घसरणीचे सत्र दिसले. HUL च्या शेअरमध्ये जवळपास दीड टक्के घसरण दिसली. तर LTEM, HDFC Life, Bajaj Finance आणि SBI Life च्या शेअरमध्ये जवळपास 1 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसली. आज दुपारपर्यंत आणि नंतरच्या सत्रात बाजार आता कोणते वळण घेतो याकडे गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचे लक्ष आहे.