बदलापूरच्या शाळेतील लहानग्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस येताच अख्खा महाराष्ट्र हादरला. या घटनेप्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटकही झाली. मात्र सोमवारी त्याला दुसऱ्या एका केससंदर्भातील चौकशीसाठी तळोजा येथून बदलापूरला घेऊन जात असताना त्याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. व्हॅनमध्ये बसलेल्या अक्षयने पोलिसांवर गोळी झाडल्याने स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला, त्यातील एक गोळी अक्षयच्या डोक्याला लागली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेवरून सध्या बराच गदारोळ सुरू असून हे फेक एन्काऊंटर असल्याचा दावा करत अक्षय शिंदेच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
दरम्यान या घटनेला आता चार दिवस उलटून गेले आहेत. तरी अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नसून त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. हायकोर्टाने सरकारला सूचना दिल्यानंतर पोलिसांची स्थानिक प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. कुटुंबियांकडून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी बदलापूर तसेच आसपासच्या परिसरात जागेचा शोध सुरू आहे.
अक्षय शिंदेचा कथित एन्काऊंटर झाल्यापासून आता जवळपास चार दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. बुधवारी यांसदर्भात मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. त्यादरम्यान न्यायाधीशांनी पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. प्राथमिकदृष्ट्या हा एन्काऊंटर वाटत नाही, एन्काऊंटरची व्याख्या वेगळी असते असा स्पष्ट निष्कर्ष न्यायालयाने नमूद केला आहे. यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडून मागण्यात आली आहेत.
याचदरम्यान अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागेचा शोध अद्याप सुरू आहे. आम्हाला अक्षयचा मृतदेह दफन करायचा आहे, अशी भूमिका त्याच्या कुटुंबियांनी घेतली होती. मात्र त्यासाठी देखील जागा उपलब्ध होत नाहीये. यासंदर्भात हायकोर्टाने सूचना दिल्यानंतर आता बदलापूर तसेच डोंबिवलीमध्ये स्थानिक प्रशासनाशी पोलीस चर्चा करत आहेत. ही चर्चा पूर्ण झाल्यावर आज किंवा उद्या अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे समजते. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी आता 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापूरमध्ये होऊ देणार नाही, स्थानिक आक्रमक
अक्षय शिंदेवर बदलापुरातील मांजर्ली स्मशानभूमी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका परिसरातील नागरिकांनी घेतली आहे. ज्याने आमच्या चिमुकल्यांवर अत्याचार केले, त्याचे अंत्यसंस्कार इतर कुठेही करा, पण बदलापूरमध्ये आम्ही हे होऊ देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
दरम्यान अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे आता दहन होणार नसून त्याचा मृतदेह दफन करण्यात येणार आहे, त्याच्या कुटुंबियांनी ही भूमिका घेतली आहे. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. त्याच्या मृतदेहाचे दफन करता यावे यासाठी आता जागेचा शोध सुरू आहे.