महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे आज रात्री 8 वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीश गर्ग, उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार, उपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहू, उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार, उपनिवडणूक आयुक्त त्याचबरोबर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.
२७ ते २८ सप्टेंबर या दोन दिवसीय भेटी दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात बैठकांचं सत्र पार पडत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतंच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. अमित शाह यांच्या उपस्थितीत नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला. महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी महायुतीकडून घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबरला जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर महाविकास आघाडीतही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्यामुळे मविआ नेत्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे विधानसभेत मविआला लोकसभा निवडणुकीसारखंच यश मिळतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.