टीम इंडिया बांगलादेश दुसरा आणि अंतिम कसोटी सामना कानपूरमधील ग्रीन पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला पावसामुळे 1 तास विलंबाने सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 10 वाजता टॉस झाला आहे. पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे टॉस आणि सामन्याला विलंब झाला आहे. नियोजित वेळेनुसार सकाळी 9 वाजता टॉस तर 9 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे खेळातील 1 तासा वाया गेला आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार रोहित शर्मा याने बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. अर्थात टीम इंडिया पहिले फिल्डिंग करणार आहे. कॅप्टन रोहितने दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. रोहितने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने पराभवानंतर 2 बदल केले आहेत.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल
बांगलादेशचा कॅप्टन नजमुल शांतो याने तस्किन अहमद आणि नाहिद राणा या दोघांना बाहेर बसवलंय. तर त्यांच्या जागी खालेद अहमद आणि तैजुल इस्लाम या दोघांचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे. बांगलादेश या 2 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे बांगलादेशचा हा सामना जिंकून मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या 2 शिलेदारांच्या कामगिरीकडे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचं लक्ष असणार आहे.
शाकिबचा भारतातील अखेरचा सामना
दरम्यान बांगलादेशचा ऑलराउंडर आणि माजी कर्णधार शाकिब अल हसन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बांगलादेश या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. त्या मालिकेतील शेवटचा सामना हा मीरपूर येथे होणार आहे. शाकिबला त्या सामन्यात सुरक्षा दिल्यास त्याचा तो शेवटचा सामना असेल. अन्यथा शाकिब भारतातील या सामन्यानंतरच निवृत्त होणार असल्याचं त्यानेच गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद आणि खालेद अहमद