इचलकरंजी
पंचगंगा नदीचे प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना अंतर्गत राज्य शासनाने इचलकरंजी शहर व परिसरात तीन अत्याधुनिक सामुहिक सांडपाणी औद्योगिक प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या 529 कोटीच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली आहे. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे तसेच डॉ. राहुल आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.
कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह नदीकाठावरील घटकांसह विविध गावांतील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे पंचगंगा मोठ्या प्रमाणात प्रदुषित होऊन देशातील प्रदुषित दहा नद्यांमधील तिचा समावेश झाला. ही पंचगंगा प्रदुषणमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु होते. प्रदुषणमुक्तीसाठी आवश्यक उपाययोजना अंतर्गत एमआयडीसीकडून 529 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प अहवाल सोमवारी कॅबिनेटसमोर सादर करण्यात आला. यामध्ये इचलकरंजी शहर व परिसरात तीन अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वच विभागांकडून तात्विक मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये वस्त्रोद्योग व पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी 25 आणि उद्योग विभागाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे सर्वच सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन पंचगंगा प्रदुषणमुक्त होणार आहे. पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखून ती प्रदुषणमुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व शासनाचे आभार मानलेआहेत.